आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रण महोत्सवामुळे बदलला भूकंपग्रस्त भुजचा चेहरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुज - दहा वर्षांपूर्वी प्रलयंकारी भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेले गुजरातमधील कच्छ आता ‘रण महोत्सवा’मुळे देशातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत आहे. डिसेंबरच्या प्रारंभी सुरू होणारा हा महोत्सव देश-विदेशातील पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. यात पर्यटन महामंडळाने केलेली व्यवस्था आणि भव्य ‘टेंट सिटी’ महोत्सवाला मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादाची साक्ष आहे.
पर्यटक येथे दाखल झाले की व्हाइट रण, कच्छी हस्तकला आणि शिल्पे पर्यटकांवर मोहिनी टाकतात. बन्नी परिसराने कात टाकल्याचे यातून स्पष्ट होते. येथे दाखल झाले की, ‘कच्छ न देखा तो कुछ न देखा’ असे फलक पाहून उत्सुकता ताणली जाते. निसर्गरम्य वातावरणात पर्यटक हरवून जातात. एकेकाळी सर्वांत मागास म्हणून ओळखल्या जाणा-या या भागात पर्यटकांची वर्दळ वाढल्याने व्यवसायात चांगली वाढ झाली. धोरडो, हुडको, भिरांडीयारा आणि जवळच्या गावांमधील लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याने सुबत्ताही आली आहे. या गावांत आता अनेक आधुनिक बदल, गोष्टी आल्याचे दिसत आहे. पशुपालन आणि शेती यानंतर इको-टुरिझमच्या माध्यमातून येथे विकासाला चालना मिळाल्याची माहिती धोरडो ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मियाँ हुसेन गुलबेग यांनी दिली.
वैशिष्ट्ये काय?
१> डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होतो रण महोत्सव.
२> कच्छ संस्कृतीचे अवघे रंग येथे पाहावयास मिळतात.
३> भुजपासून 80 किलोमीटरवर धोरडो गावाजवळ पर्यटकांच्या निवासासाठी उभारण्यात आलेली खास टेंट सिटी आकर्षण ठरते.
टेंट सिटी आकर्षण - पर्यटकांना टेंट सिटीचे प्रचंड आकर्षण आहे. 90 एकर परिसरावर टेंट सिटी उभारण्यात आली आहे. 400 तंबूत सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहेत. 15 घरे पारंपरिक भुंगा बांधण्यात येत आहेत. 75 टक्के बुकिंग झाल्याचे गुजरात पर्यटन महामंडळाचे संचालक कमलेश पटेल यांनी सांगितले.