आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणवीर सेनेच्या क्रूरकर्मा मुखियाची अखेर, सर्मथकांचा हिंसाचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरा (बिहार) - नव्वदच्या दशकात बिहारमध्ये नरसंहारासाठी कुख्यात असलेल्या रणवीर सेनेचे संस्थापक ब्रेम्हेश्वरसिंह यांची शुक्रवारी पहाटे हत्या करण्यात आली. या हत्येनंतर ब्रेम्हेश्वरसिंह यांच्या सर्मथकांनी आरा शहरात प्रचंड हिंसाचार घडवून आणला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे.

शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ब्रेम्हेश्वरसिंह ऊर्फ बरमेसर मुखिया घरून फिरण्यासाठी बाहेर पडले होते. तेवढय़ात मोटारसायकलवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सायंकाळी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार ब्रेम्हेश्वरसिंह यांना पाच गोळ्या लागल्या. त्यापैकी चार गोळ्या त्यांच्या छातीवर लागल्या होत्या. 29 नरसंहार आणि 227 लोकांच्या हत्या केल्याच्या आरोपाखाली ब्रेम्हेश्वरसिंह नऊ वर्षे तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वीच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती.

आरा शहरात उत्पात: ब्रेम्हेश्वरसिंह यांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या जमावाने आरा शहरात न्यायमूर्तीचे निवासस्थान, रेल्वेस्टेशन, विर्शामगृहासह अन्य सरकारी कार्यालयांची तोडफोड करून जाळपोळ केली. स्टेशनवर पाटणा-दिल्ली राजधानी एक्स्प्रेससह अनेक रेल्वेंवर हल्ले करण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेले बिहारचे पोलिस महासंचालक अभयानंद यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. संतप्त जमाव मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरामध्ये येण्याची मागणी करत होता.

प्रशासनाकडून कडक कारवाई : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यांमधून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला आहे.

बिहारमध्ये जातीय हिंसाचारास पुन्हा सुरुवात झाली असल्याचे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. राजद, काँग्रेस आणि लोक जनशक्ती पार्टीने या घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आराच्या शेजारील औरंगाबाद, जहानाबाद आणि नवादा या जिल्ह्यांमध्ये दोन दशके जातीय हिंसाचाराने थैमान घातले होते. जातीय हिंसाचाराचा सर्वाधिक धोका याच परिसरात आहे.

मुखियावर 227 लोकांच्या हत्यांचा आरोप

नक्षलवाद्यांच्या विरोधात बिहारमध्ये 1994 मध्ये बरमेसर मुखिया यांच्या नेतृत्वाखाली रणवीर सेनेची स्थापना करण्यात आली होती. 1995 ते 2000 या कालावधीत रणवीर सेनेने 29 नरसंहार घडवून आणले. मुखियावर 227 लोकांच्या हत्येत सहभागी झाल्याचा आरोप आहे. त्यात लक्ष्मणपूर बाथे आणि बथानीसारख्या कुख्यात नरसंहारांचा समावेश आहे. रणवीर सेनेवर नंतर बंदी घालण्यात आली. मुखियाला 2002 मध्ये अटक करण्यात आली. त्याच्यासाठी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर नऊ महिन्यांपूर्वी मुखियाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. 22 पैकी 16 गुन्ह्यांतून त्यांची निदरेष सुटका झाली होती. 5 मे 2012 रोजी अखिल भारतीय राष्ट्रवादी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती.
PHOTOS : रणवीर सेनेच्या प्रमुखांची हत्या कशी झाली ते पाहा!
फक्त २७७ हत्या अन् २२ नरसंहार, जाणून घ्या रणवीर सेनेच्या प्रमुखाबाबत...