आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ratan Tata Speak On Rich China, India Adjust Him

ड्रॅगनची भरारी : आर्थिक सुबत्तेची धास्ती नको पण..चीनशी जुळवून घ्या - रतन टाटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चीनच्या मजबूत अर्थव्यवस्थेची आपल्याला चिंता वाटण्याचे कारण नाही. उलट भारताने चीनसोबत आर्थिक क्षेत्रातील भागीदार बनण्याची संधी शोधावी, असे टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी म्हटले आहे. आर्थिक प्रगती साधायची असेल तर चीनशी जुळवून घ्यावे लागेल, असा संकेत टाटा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.
भारत-चीन संबंधाबाबत टाटा म्हणाले की, दोन्ही देशातील संबंध सध्या शत्रुत्वाचे नाहीत, परंतु त्याचबरोबर तेवढे चांगलेही नाहीत. चीनने भारतविरोधी धोरण राबविले नाही. मात्र, चीनच्या वाढत्या अर्थव्यवस्थेची चिंता भारताला सतावत असते. वास्तवात आपण असे दाखवत नाही. चीनच्या प्रगतीवरून चिंता वाटते काय, या प्रश्नावर टाटा म्हणाले, आपली तशी भावना होत नाही. चीनची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या सोबतीने आर्थिक उन्नतीच्या वाटा शोधायला हव्यात. भारताने चीनकडे सशक्त भागीदार म्हणून पाहिले पाहिजे.
चीन आशियावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे, अशी धारणा भारतीयांची आहे. अगदी तशीच भावना चिनी लोकांची भारताविषयी आहे. चीन पाकिस्तानला मदत करतो. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. मात्र पाकला त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे तो दुय्यम दर्जाचा शत्रू ठरला आहे. असे टाटा यांनी दोन्ही देशांतील संबंधाबाबतचे विश्लेषण केले.
चीनच्या कार बाजारपेठेविषयी टाटा म्हणाले की, बाहेरच्या देशांतून चीनमध्ये कार विक्री करणे अवघड काम आहे. चीनी लोकांना त्यांच्याच कार चालतात, टाटा मोटर्सच्या नाहीत त्यामुळे आम्ही तेथील जेएलआर कंपनीचे अधिग्रहण केले आहे. चीनने आॅटोमोबाइल क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आॅटोमोबाइल्सचे सुटे भाग घेण्याच्या विचारात आहोत. चीनने आॅटोमोटिव्ह क्षेत्रात जेवढ्या कालावधीत कारचे उत्पादन केले, त्यापेक्षा अधिक भारताने कार निर्मिती केली आहे. भारतीय कारच्या भागाचे जुळवाजुळवीचे काम चीनमध्ये आऊटसोर्सिंगद्वारे करण्याचा आमचा मानस आहे. भारत अद्यापपर्यंत उत्पादन करत नसलेल्या अ‍ॅटोमॅटिक ट्रान्समिशनची चीनकडून खरेदी केली जाऊ शकते, असे टाटा यांनी सांगितले.
जागतिक अर्थव्यवस्थेबाबत टाटा म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेची काहीशी गंभीर अवस्था आहे. यूरोप आणि ब्रिटनला याचा सर्वाधिक फटका बसेल. या संकटातून अमेरिका युरोपपेक्षा लवकर बाहेर पडेल. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या काही भागात व्यावसायिक संधी आहेत. आशियायी देशांना संबंधित देशांत व्यवसाय करण्याला वाव आहे. औद्योगिक विकास साधल्यास दक्षिणेतील देशांची आर्थिक प्रगती आपोआप होईल, त्यांनी स्पष्ट केले.
समूहात पारदर्शकता आणू शकलो नसल्याचे शल्य- आपल्या समूहात मोकळेपणा आणि पारदर्शकता आणण्यात यश आले नाही, याची कायम खंत राहील, असे टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी म्हटले आहे. गेल्या 21 वर्षांपासून समूहाचे अध्यक्षपद सांभाळत असलेले टाटा यावर्षअखेर निवृत्त होत आहेत. समूहाचे प्रमुख म्हणून असे कोणते काम तुम्ही करू शकला नाहीत, असा प्रश्न टाटांना विचारण्यात आला. त्यावर टाटा म्हणाले की, टाटा समूह मुख्यत: मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा ग्रुप आहे. असे असताना ग्राहक मूल्य योग्य पद्धतीने अंगीकारले नाही. त्यामुळे जेवढ्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते, तेवढे उद्दिष्ट गाठू शकलो नाही. नॅनो त्याचे उत्तम उदाहरण आहे.
निवृत्तीनंतर समाजसेवा- टाटा डिसेंबरमध्ये 100 अब्ज डॉलर समूहाचे प्रमुखपद सोडणार आहेत. निवृत्तीनंतरही फाउंडेशनचा अध्यक्ष कायम राहणार आहे. ग्रामीण विकास, जलसंधारण क्षेत्रात लक्ष घालणार असून मुले, गरोदर महिलांच्या आहाराबाबत जागृती करणार असल्याचे टाटा यांनी सांगितले.
देशाच्या भरभराटीसाठी उद्योजकांनी झटावे : टाटा
1991 नंतर आम्ही बदललो : रतन टाटा
टाटा समूहाची जबरदस्‍त ऑफर, स्‍वस्‍तात देणार घरे