आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणोक्षणी बदलत्या दरांमागील वास्तव; प्रत्येक ऑफर म्हणजे स्वस्त नव्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात स्पाइसजेटने तीन दिवसांत 10 लाख विमान तिकीटे अवघ्या 2013 रुपयांत विकण्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. यामध्ये सर्व प्रकारचे करही समाविष्ट होते. नाइलाजास्तव एअर इंडिया आणि इंडिगोसारख्या इतर विमान वाहतूक कंपन्यांनाही तिकिटांचे दर कमी करावे लागले. अमेरिका आणि युरोपपाठोपाठ आता भारतातही ग्राहकांना डायनामिक प्रायझिंगचे फायदे मिळण्यास प्रारंभ झाला आहे. मागणीनुसार किंमत. मागणी कमी तर किंमतही कमी. मागणी वाढल्यावरच किंमत वाढवली जाईल. हॉटेल तसेच विमान प्रवासाच्या तिकिटांबाबत ही पद्धत आता चांगलीच प्रचलित झाली आहे.
स्पाइसजेटच्या या योजनेचा फायदा फक्त 1.5 लाख लोकांनाच घेता आला. कारण पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत त्यांचे सर्व सर्व्हर क्रॅश झाले. तिकीट बुकिंगसाठी इच्छुकांनी मेकमायट्रीप, क्लिअरट्रीप किंवा ट्रॅव्हलगुरू या वेबसाइटला भेट दिली तेव्हा त्यांना स्पाइसजेटची ही ऑफर मिळाली नाहीच, शिवाय तिकिटासाठी 5 ते 10 हजार रुपये अधिक मोजावे लागले.
डायनामिक प्रायझिंगच्या बळावरच मेकमायट्रीप सर्वात कमी दराने तिकिटे विकल्याचा दावा करते आहे. यापेक्षा स्वस्त तिकीट दुसरीकडे मिळाल्यास, फरकाच्या दुप्पट रक्कम देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्याच वेळी हॉटेलडॉटकॉम व अगोडा डॉट कॉम स्वस्त भाड्यात हॉटेल खोल्या देण्याचा दावा करतात.
एवढेच नव्हे तर आता टेलिकॉम कंपन्या आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सही डायनामिक प्रायझिंगची मदत घेत आहेत. युनिनॉरने 2437 चा बदलता प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये एकूण वापरावर कॉल दर ठरत असतो. अत्यधिक वापराच्या वेळी चढे दर व वापर कमी असताना कमी दर. 20 पैशांपासून 50 पैसे प्रतिमिनिट कॉल दर. असाच काहीसा प्रकार डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये पाहायला मिळतो. हिरव्या पालेभाज्या, मासे व मांसासह लवकर खराब होणार्‍या अनेक वस्तू स्वस्त दरात विकल्या जातात.
ट्रॅव्हल इंडस्ट्रीतही हेच दिसते आहे. हॉटेलच्या रुम्स जर बुक झाल्या नाहीत, तर त्यांची किंमत शून्य. याचप्रमाणे विमानाची तिकिटे विकली गेली नाहीत, तर विमानातील आसने रिकामी राहणार.
इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे उपाध्यक्ष सरबजितसिंग यांच्या मते रुम्स रिकाम्या राहण्यापेक्षा दोन पैसे कमी मिळणे कधीही चांगलेच. काहीतरी पैसे मिळतीलच. म्हणूनच उच्च श्रेणीची काही हॉटेल्स आणि विमान कंपन्या शेवटच्या क्षणी 70 ते 80 टक्के सवलतीच्या दराने बुकिंग करतात.
इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे अध्यक्ष सुभाष गोयल मात्र या पद्धतींबाबत फारसे समाधानी नाहीत. त्यांनी सांगितले की, विमान तिकिटे आणि हॉटेल रुम्सच्या भाड्यातील चढउतारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने ठोस उपाय करावेत. कारण अशा व्यवहारांमुळे लवकर बुकिंग करणार्‍या ग्राहकांचे शेवटी बुकिंग करणार्‍यांच्या तुलनेत नुकसान होेते.

सावधान! ऑफरच्या नावाखाली भुर्दंड सहन करू नका
विमान तिकीट
ऑफर : स्पाइसजेटची 10 लाख एअर तिकिटे 2013 रुपये दराने.
वास्तव : 1.5 लाख तिकिटे विकली जाताच वेबसाइट क्रॅश

मोबाइल कॉल

ऑफर : युनिनॉरच्या वतीने कॉल दर ट्रॅफिकनुसार कमी करण्याची योजना
वास्तव : फार वापर नसलेला काळ रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे असतो.

खाद्यपदार्थ
ऑफर: रिलायन्स फ्रेशसारखे स्टोअर खाद्यपदार्थांचे दर काही तासांसाठी 50 टक्क्यांपर्यंत कमी करतात.
वास्तव : ग्राहक येताच किमती वाढतात. अनेकदा तर पूर्वीपेक्षाही किंमत वाढते.

हॉटेल

ऑफर : रूम बुकिंगमध्ये 70 ते 80 % सूट
वास्तव : अशी ऑफर बहुतांशी कामाच्या दिवसांतच. सुटीच्या काळात चढ्या दराने बुकिंग होते.