आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरडीएक्सलाही टक्कर देणारी मजबूत भिंत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसद भवन तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांचे बॉम्बस्फोटांपासून संरक्षण करणे आता सहज शक्य होणार आहे. दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चने (सीएसआयआर) केलेल्या संशोधनामुळे हे शक्य होणार आहे. दहशतवादी हल्ल्यापासून बचावासाठी या दोन्ही संस्थांनी एक मजबूत भिंत तयार केली आहे. ‘सॅक्रेफिशियल वॉल’ असे या भिंतीचे नाव असून ही भिंत कितीही तीव्रतेच्या बॉम्बस्फोटांना सहज टक्कर देऊ शकते.
अशी तयार केली भिंत..
सॅक्रेफिशियल वॉलमध्ये सीएसआयआरने सिंथेटिक फोमचे मटेरियल तयार केले आहे. राख आणि अ‍ॅल्युमिनियमपासून ते तयार करण्यात आले असून याचे पेटंट केवळ भारताकडे आहे. दिल्लीतील आयआयटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. वसंत ए. मतसागर आणि यांच्या टीमने भिंत तयार करण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. मोठ्या घातपातांच्या परीक्षणाची सुविधा आपल्याकडे नसल्यामुळे या भिंतीचे परीक्षण इटली व जर्मनीत करण्यात आले. देशाला वाढता दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन त्यातून महत्त्वाच्या ठिकाणांचा बचाव करण्यासाठी या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
6 इंचांची भिंत देणार टक्कर
संशोधनात तयार करण्यात आलेली 6 इंची मजबूत भिंत 10 फूट अंतरावर झालेल्या 10 किलो आरडीएक्सच्या स्फोटांनंतरही तग धरू शकते. आरडीएक्सच्या जबरदस्त स्फोटांनंतरही इमारतीतील लोक सुरक्षित राहतील तसेच मुख्य इमारतीला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही. दिल्लीत संसद भवन तसेच मुंबईतील ताज हॉटेलवर याआधी दहशतवादी हल्ला झाला आहे.