आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक दान ‘समाजकार्य’ नव्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -किंगफिशर विमान कंपनीचे तोट्यामुळे मोडकळीस आलेले ‘दरवाजे’ ठीकठाक करण्याचे सोडून मालक आणि उद्योजक विजय मल्ल्या यांनी कर्नाटकातील एका मंदिरासाठी अडीच किलो सोन्याचा दरवाजा (किंमत पाच कोटी रुपये) दान दिला होता. त्यांच्या या देणगीवर उलटसुलट चर्चाही सुरू होती. अशाच प्रकारे शिर्डीचे साईबाबा मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, अजमेर शरीफ दर्गा, गुरुद्वारा हरमंदिर साहिब, अमृतसरसह देशातील अनेक धार्मिक ठिकाणी तसेच बाबा, स्वामींच्या आश्रमात दरदिवशी कोट्यवधींचे दान दिले जाते. असे दान देण्यात बडे उद्योगपतीही मागे नसतात. मात्र, असे दान भविष्यात कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

देवाधर्मासाठी केलेल्या दानाचा कंपन्यांच्या उद्योजकांनी सीएसआर म्हणून उल्लेख केला आहे किंवा नाही याची नेमकी माहिती पुढे आलेली नाही. परंतु आगामी काळात कंपन्यांना तसा दावा करणे शक्य होणार नाही. कंपनी व्यवहार मंत्रालयाने धार्मिक दानाला सीएसआरच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात इतरही अनेक नियम बनवण्यात आले आहेत. व्यक्तिगत दानाला कंपनीच्या सीएसआरमध्ये समाविष्ट करण्यापासून रोखणे व त्याचा वापर प्रत्यक्ष समाजकार्यासाठी व्हावा हा त्यामागील उद्देश आहे. एका अधिका-याने सांगितले की, जर एखाद्या कंपनीचा मालक, संचालक आपल्या पातळीवर गरिबांना पांघरण्यासाठी रग वाटत असेल किंवा महाप्रसादाचे (भंडारा) वाटप करत असेल तर त्यालाही सीएसआर कक्षेच्या बाहेर ठेवले जाईल.

यासंदर्भात कंपनी व्यवहारमंत्री सचिन पायलट यांनी सांगितले की, सरकारी कंपन्या आधीपासूनच त्यांच्या उत्पन्नापैकी पाच टक्के वाटा हा सामाजिक दायित्वासाठी खर्च करतात. खासगी कंपन्यांनीही त्यापासून आदर्श घेऊन समाजकार्यासाठी निधी दिला तर मोठा सामाजिक बदल सहजतेने घडू शकतो. वैयक्तिक व धार्मिक दान सीएसआर फंडाबाहेर ठेवण्याचा निर्णय त्यासाठीच घेतला गेला आहे, जेणेकरून याचा उपयोग धार्मिक कार्याऐवजी प्रत्यक्ष समाजकार्यासाठी झाला पाहिजे.