आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात रंगला साधु-संतांच्या वादाचा आखाडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - शाही स्नानादरम्यान पवित्र स्नान करण्याचा अधिकारावरून साधू-संतांमध्ये जुंपली आहे. आपणाला योग्य तो सन्मान न मिळाल्यास आगामी शाही स्नानावर बहिष्काराचा इशारा एका आखड्याने दिल्यामुळे महाकुंभमेळा वादाचा आखाडा बनला आहे.

वैष्णव पंथातील साधूंचा सहभाग असलेल्या निर्मोही आखाड्याने मौनी अमावास्या आणि वसंत पंचमीला होणा-या शाही स्नानामध्ये महंत ग्यानदास यांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.त्यांना सन्मानपूर्वक पद्धतीने सामावून न घेतल्यास बहिष्कार टाकण्याचा इशारा निर्मोही आखाड्याने दिला आहे. महंत ग्यानदास सध्या प. बंगालमधील गंगासागरमध्ये आहेत. कुंभमेळ्यातील शाही स्नानामध्ये विविध आखाड्यांना विशेष महत्त्व दिले जाते.

मकर संक्रातीदिनी वैष्णव, दिगंबर, निर्मोही व निर्वाणी आखाड्याच्या प्रमुखांनी स्नान केले. यादरम्यान ग्यानदास यांना निमंत्रित केले नसल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी आहे. निरंजनी आखाड्याचे प्रमुख स्वामी नरेंद्र गिरी आणि निर्मोही आखाड्याच्या साधूंमध्ये भांडण झाल्यानंतर येथील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

प्रशासनाने शनिवारी विविध आखाड्यांची बैठक घेतली. यामध्ये आगामी शाही स्नानाला ग्यानदास यांना निमंत्रित करण्याची मागणी निर्मोही आखाड्याच्या साधूंनी केली. स्वामी नरेंद्र गिरी यांनी त्याला विरोध करत बहुतांश आखाड्यांचा महंत बलदेवसिंग यांना पाठिंबा असल्याने अन्य गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली. त्यावर गिरी प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत आपली मागणी मान्य न झाल्यास शाही स्नानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निर्मोही आखाड्याने दिला आहे.