आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्दींचा दौरा रद्द, मुंबईतील अंडरवर्ल्डला हत्येची सुपारी ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - आपल्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकामुळे वादाच्या भोव-यात सापडलेले लेखक सलमान रश्दी यांनी सुरक्षेच्या कारणावरून जयपूर साहित्य महोत्सवातील आपला सहभाग टाळला आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुंबईतील अंडरवर्ल्डला आपल्या हत्येची सुपारी देण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट रश्दी यांनी केला आहे. यामुळे आपण भारत दौरा रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी जयपूर साहित्य महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी रश्दींच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकाचे वाचन पोलिसांनी हस्तक्षेप करून थांबविले. रश्दी महोत्सवात सहभागी होण्यासाठी शेवटच्या दिवशी जयपूरमध्ये येतील, अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात येत होती. मात्र ते आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महोत्सवात सहभाग नोंदवणार आहेत. जेएलएफचे आयोजक संजय रॉय यांनी शुक्रवारी रश्दी यांचे भाषण वाचून दाखवले. भारताचा दौरा करणे हे आयोजक व कुटुंबीयांप्रती बेजबाबदारी दाखवल्यासारखे होईल, असे रश्दी यांनी म्हटले आहे.
जेएलएफच्या संचालक नमिता गोखले यांनी हा प्रकार निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. 2007मध्ये रश्दींच्या दौ-यावेळी कोणत्याही अडचणी नव्हत्या, याच वर्षी काय घडले, असा सवालही त्यांनी केला.
मुस्लिम संघटनांकडून स्वागत
रश्दी यांच्या निर्णयाचे मुस्लिम धर्मातील अनेक समुदायांनी स्वागत केले आहे. जमाते इस्लामी हिंदचे नेते मोहम्मद सलीम यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. लोकांच्या धार्मिक भावनांची कदर करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.