Home »National »Delhi» Sc On Mns, Shivsena

शिवसेना व मनसेची मान्यता रद्द का करु नये? सुप्रीम कोर्टाचा सवाल

दिव्य मराठी वेब टीम | Jan 08, 2013, 10:20 AM IST

  • शिवसेना व मनसेची मान्यता रद्द का करु नये? सुप्रीम कोर्टाचा सवाल
नवी दिल्ली- शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांची मान्यता का रद्द करू नये? असा सवाल सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केला आहे. या दोन्ही पक्षांकडून सातत्याने प्रक्षोभक भाषणे व वक्तव्य केली जात असल्याचे सांगत या पक्षांच्या विरोधात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेची सुनावणी करताना कोर्टाने वरील मत व्यक्त केले आहे.
ब्रिजेश कलापा या वकिलाने शिवसेना व मनसेकडून वारंवार प्रक्षोपक भाषणे होत असल्याचे सांगत अशा पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी याचिका दाखल केली होती. अशा प्रक्षोपक भाषणांमुळे देशातील एकता धोक्यात आली प्रांता-प्रांतात व दोन समाजात द्वेष पसरविला जात आहे, त्यामुळे या पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली पाहिजे, असे याचिकेत म्हटले होते. आज त्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने या पक्षांना इशारा देत निवडणूक आयोगाला संबंधित पक्षांची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली आहे. तसेच निवडणूक आयोगाने याबाबत आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या सवालाचा शिवसेनेने आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाने आमच्याकडे येण्यापूर्वी एमआयएम पक्षाकडे व खासदार ओवेसीच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, अशी खोचक टीप्पणी केली आहे.

Next Article

Recommended