आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Senior Citizens Ministry Asks States To Sensitise Police ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठ नागरिकांविषयी संवेदनशीलता वाढवा; केंद्र सरकारचे निर्देश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याबाबत पोलिस आणि प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना दिल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी साज-या होणा-या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनासाठी ‘ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता’ ही संकल्पना निश्चित करण्यात आल्याचेही राज्यांना सूचित करण्यात आले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री मुकुल वासनिक यांनी यासंबंधी सर्व राज्यांना पत्र पाठवून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवित आणि संपत्तीच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आणि प्रशासन अधिक संवेदनशील बनवण्यासाठी राबवायच्या कार्यक्रमांचा तपशीलही दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त सुरक्षिततेची हमी देण्यासाठी पंचायत राज संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, नेहरू युवा केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जाणीव-जागृती कार्यक्रम राबवण्याच्या सूचना वासनिक यांनी या पत्रात केल्या आहेत.
लवकरच सुधारित धोरण : देशातील ज्येष्ठ नागरिकांचे जगणे अधिक सुकर आणि सुरक्षित व्हावे म्हणून केंद्र सरकार लवकरच सुधारित ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्रालयाने म्हटले आहे. या धोरणाचा मसुदा तयार असून तो विविध मंत्रालये आणि विभागांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे.
शुश्रूषागृहे उघडणार : देशातील प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी शुश्रूषागृहे (डे केअर सेंटर्स) आणि वृद्धाश्रम स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. पालक आणि ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहेत.