आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Senior Police Officer Direct Contact With Public

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी सर्वसामान्यांचा थेट संपर्क !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार देशभरातील सर्व पोलिस ठाण्यांबाहेर प्रभारी पोलिस अधिका-याच्या कार्यालय व घरच्या दूरध्वनी क्रमांकासोबतच आता मोबाइल क्रमांकही झळकणार आहे. आसाममध्ये घडलेल्या युवती अत्याचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
आसाममधील या घटनेत एका तरुणीची काही जणांनी प्रथम छेड काढली व नंतर तिचा पाठलाग करत तिचे कपडे फाडले. या प्रकरणाच्या तपासात आढळले की, हा सर्व प्रकार घडत असताना काही नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फोन एंगेज असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर नागरिकांनी नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती दिली, तेव्हा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिस दलातील वरिष्ठ अधिका-यांशी थेट संपर्क होऊ शकत नसल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत एखाद्या घटनेची सूचना थेट पोलिस ठाण्यात मिळू शकत नाही. नियंत्रण कक्षाच्या ‘100’ क्रमांकावर फोन केल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यास सूचना मिळते. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांना उशीर होतो. हे टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रमुख पोलिस अधिका-याचा मोबाइल क्रमांक नागरिकांसाठी जाहीर करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-यानुसार पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याची किंवा आपले प्रकरण योग्य रीतीने हाताळले जात नसल्याची फिर्यादीची तक्रार असते. अशा प्रकारांना आळा बसावा हा देखील या निर्णयामागचा उद्देश आहे.
एकाच सीरिजचे क्रमांक - गृहमंत्रालयाच्या या निर्देशात दिल्ली पोलिस विभागाच्या धर्तीवर मोबाइल कंपनीकडून कॉर्पोरेट कनेक्शन प्राप्त करून वरिष्ठ पोलिस अधिका-यांना एकाच सीरिजचे क्रमांक देण्यास राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे. हे क्रमांक अधिका-यांना नव्हे तर त्यांच्या पदाला दिले जातील. त्यामुळे एखादा अधिकारी बदलून गेला तरी संबंधित पदाचा क्रमांक तोच राहील व त्या जागी येणा-या दुस-या अधिका-याशी नागरिक त्या क्रमांकावर संपर्क साधू शकतील.