आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेच्या लालसेपोटीच लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानातून भारतात : शकील अहमद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीकर (राजस्थान)- फाळणीपूर्वी पाकिस्तानात राहत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे सत्तेसाठी व राज्यकर्ता बनण्यासाठी भारतात स्थलांतरित झाले असून ते हिंदूंच्या सेवेसाठी नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी केले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते व बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले अहमद यांनी आज राजस्थानमध्ये एका सार्वजनिक सभेत अडवाणी यांच्यावर हल्ला चढविला. अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन जिना यांना खरे राष्ट्रप्रेमी व धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत मुस्लिम समाजाची सहानुभूती घेण्याचा २००५ मध्ये प्रयत्न केला होता. त्यानंतर अडवाणी यांना आरएसएसने पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते. तेव्हापासून मुस्लिम समाजात अडवाणींची प्रतिमा उंचावली होती. त्याचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या धोरणांतर्गत शकील अहमद यांनी अडवाणींना लक्ष्य़ केले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

सीकरमध्ये बोलताना शकील अहमद म्हणाले, लालकृष्ण अडवाणींचा जन्म पाकिस्तानात झाला. एवढेच नव्हे तर त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पाकिस्तानमध्येच घेतले आहे. पण पुढे भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्रे निर्माण झाली. अडवाणी यांनी भविष्याचा विचार करीत व राजकीय क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी भारतात येण्याचे ठरवले. त्याचवेळी त्यांनी मुंबईतील एका लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले व यथावकाश अडवाणींनी राजकारणात प्रवेश केला, असा आरोप अहमद यांनी केला.

अहमद म्हणाले, अडवाणी यांनी त्या काळात बीए केले होते त्यांना त्या काळात सहज तेथे नोकरी मिळाली असती. पण अडवाणींना भारतात हिंदू सेवेचे निमित्त करुन भारतात यायचे होते व राजकारणात सत्ता हस्तगत करायची होती व अजूनही आहे. पाकिस्तानात आजही ३ टक्के हिंदू समाज राहत आहे. मग त्यांनी तेथील हिंदूची सेवा करण्याचे धाडस का केले नाही. कारण अडवाणींना माहित होते की, मुस्लिम राष्ट्रात आपल्याला पंतप्रधानपद कधीच मिळवता येणार नाही, म्हणूनच अडवाणी यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचे अहमद यांनी सांगितले.