आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्कींगला तरूणाई कंटाळली!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - फेसबुक, गुगल प्लस, ट्विटर, आॅर्कुट, लिंकडेन, मायस्पेस, फ्रेंड्स्टर, हाय फाइव्ह आदी सोशल मीडिया वेबसाइटकडे शहरातील तरुणांचा ओढा कमी होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘अ‍ॅसोचॅम’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. शहरातील तरुण या साइट्सवर किती वेळ खर्च करतात आणि त्याच्या वापराचे प्रमाण किती या विषयावर अ‍ॅसोचॅमने सर्वेक्षण केले आहे.
सर्वेक्षणामध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चंदिगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, लखनऊ आणि पुणे या शहरांतील 12 ते 25 वयोगटांतील 2 हजार मुले आणि मुलींची मते सर्वेक्षणात अजमावण्यात आली. सोशल मीडियात वेळ वाया घालवण्यापेक्षा तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टींकडे तरुण पिढी लक्ष देत आहे, असे अ‍ॅसोचॅमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सर्वेक्षणातील निष्कर्षाबाबत सांगितले.
सोशल साइट्वर सुरुवातीपेक्षा कमी वेळ घालवला जात असल्याचे सर्वेक्षणात सहभागी 55 टक्के मुलांनी सांगितले. तसेच साइट्सवर साइन इन केल्यानंतरही फार कमी वेळ सक्रिय राहत असल्याचे या मुलांचे म्हणणे आहे. जवळपास 30 टक्के तरुणांनी सोशल साइटवरील अकाउंट बंद केले असून अनेकांनी त्यावरील प्रोफाइल काढून टाकल्याचे सांगितले. या साइटबद्दल विशेष आकर्षण न राहिल्यामुळे आणि साइटवरील माहिती गोपनीय राहत नसल्यामुळे प्रोफाइल मर्यादित करण्याकडे अनेकांचा कल आहे.
सर्वेक्षणातील 75 टक्के तरुणांनी विविध सोशल नेटवर्किंग साइट्स सुरू झाल्यानंतर एक फॅड म्हणून प्रत्येक साइटवर अकाउंट उघडून प्रोफाइल तयार केल्याचे सांगितले. सर्व साइटवर अकाउंट उघडले असले तरी त्यातील एका अकाउंटमध्ये सक्रिय राहणे पसंत करत असल्याचे अनेक तरुणांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणात सहभागी 20 टक्के मुले ब्लॅकबेरी मेसेंजर, मिग 33, गुगल टॉक, याहू मेसेंजरला मोबाइल अथवा कॉम्प्युटरद्वारे क्वचितप्रसंगी लॉग आॅन करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वेक्षणातून आढळून आलेली आश्चर्यकारक बाब म्हणजे भारतीय तरुण महिला, तरुणापेक्षा सोशल नेटवर्किंग साइटवर अधिक सक्रिय राहत असल्याचे दिसून आले आहे. मित्रपरिवाराशी संपर्कात राहण्यासाठी जवळपास तासभराचा वेळ या साइटवर घालत असल्याचे यातील 500 मुला-मुलींनी सांगितले. यातील तरुणींचे प्रमाण 65 टक्के असून मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहण्यासाठी दररोज सोशल साइट्सचा उपयोग करत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. या साइट्सचा वापर करणे निरर्थक वाटू लागले आहे, असे 200 पैकी 100 जणांचे म्हणणे आहे.