आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ किलोच्या दप्तराने विद्यार्थ्यांच्या पाठीशी मणक्यांचे दुखणे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - खांदा दुखणे, मान सुजणे, अशा तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे आतापर्यंत फक्त प्रौढ आणि वयोवृद्ध लोकच येत असत; पण आता शालेय विद्यार्थ्यांमध्येही ही दुखणी बळावत आहेत. दिवसेंदिवस डॉक्टरांकडे येणा-या रुग्णांमध्ये अशा मुलांची संख्या वाढत चालली असून, यास
वजनदार दप्तरे कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी सीबीएसईला आदेश दिले होते. त्यासाठी वेळोवेळी परिपत्रके काढून सीबीएसईने आपले कर्तव्य पार पाडले असले तरी खासगी शाळांची मनमानी सुरूच आहे. सीनिअर वर्गातील मुलांना आठ किलो आणि ज्युनिअर वर्गातील मुलांना पाच किलोचे दप्तर शाळेत न्यावे लागते. त्यामुळे मुलांना मणक्याचे गंभीर आजार होत आहेत.

विद्यार्थ्यांना मणक्यांचे आजार
फिजिओथेरपिस्ट अंजू चौधरी यांनी सांगितले की, आजकाल त्यांच्याकडे येणा-या रुग्णांपैकी 40 टक्के संख्या शालेय विद्यार्थ्यांची आहे आणि त्याचे कारण त्यांचे जड दप्तर आहे. मुलांना होणारे मणक्याचे आजार गंभीर स्वरूपाचे आणि दीर्घकाळ त्रास देणारे असतात.
त्यात त्यांचे बालपणही हरवते आणि आयुष्यभर विविध समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. फिजिओथेरपिस्ट संदीप कौर यांनी सांगितले की, मुलांमध्ये पाठीच्या मणक्यांचा आजार वाढत चालला असून, त्यांच्याकडे येणा-या रुग्णांपैकी 35 ते 45 टक्के रुग्ण शालेय विद्यार्थी असतात. जड दप्तराशिवाय मुलांचे एकाच स्थितीत बराच वेळ बसून राहणे आणि वाकून बसणेही याला कारणीभूत असल्याचे त्या म्हणाल्या.

शाळा संचालकांचा बचाव
सीबीएसईच्या या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची जबाबदारी शाळेचे संचालक टाळत आहेत. एका प्राचार्याचे म्हणणे आहे की, आम्ही विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसारच पुस्तके आणायला सांगतो; पण एखादे पुस्तक घरी विसरून राहण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटते. म्हणून ते सर्व पुस्तके घेऊन शाळेत येतात. लुधियानातील ग्रीन लँड शाळेच्या प्राचार्यांनी शाळेबरोबरच पालकांनाही जबाबदार धरले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पालकांनी मुलांची डायरी व वेळापत्रक तपासले पाहिजे.

सीबीएसईचे आदेश
आवश्यक तेवढीच पुस्तके शाळेत आणा.
प्राथमिक वर्गांतील मुलांनी दप्तर शाळेत आणू नये. त्यांची पुस्तके शाळेतच ठेवली जावीत.
एका विषयाची तीन पुस्तके असतील तर वेळापत्रकानुसार फक्त एकच पुस्तक आणावे.
सीनिअर वर्गांतील विद्यार्थ्यांनीही अनावश्यक पुस्तके न आणता वेळापत्रकानुसारच पुस्तके शाळेत आणावीत.

मुलांमधील लक्षणे
> जड दप्तरांमुळे मान, खांदा व पाठीत वेदना
> हाताच्या हालचाली करताना दुखणे
> चक्कर येणे, उलट्या होणे.

सावधगिरीचे उपाय
> वजन उचलू देऊ नका.
> बसलेल्या स्थितीत वाकू देऊ नका.
> शरीराला झटका बसू देऊ नका.
> डॉक्टरांचा सल्ला घ्या.