आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियाला थांगपत्ता न लागू देता सुरेश कलमाडी निघाले तरुंगाच्या बाहेर!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: दिल्ली हायकोर्टाने सुरेश कलमाडी यांची जामीनावर सुटका केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ते तरुंगातून बाहेर निघाले. परंतु तिहारमधून पडताना त्यांनी तरुंगाच्या मागच्या गेटनेच बाहेर पडणे पसंत केले. तब्बल नऊ महिन्यानंतर बाहेर येणार्‍या कलमाडींना पाहण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कलमाडींना तरुंग प्रसासनाकडून मागच्या गेटने गुपचूप बाहेर काढण्यात आले. त्याच्यासोबत त्यांचे वकील होते. कलमाडींचा आज रात्रीचा मुक्काम दिल्लीतच असणार असून ते शुक्रवारी पुण्यात येण्याची शक्यता आहे.
सुरेश कलमाडी यांना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जा‍मीन मंजूर झाल्यामुळे पुण्याचे राजकीय समीकरण बदलण्‍याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु कलमाडी पुण्यात काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी, राजधानी नवी दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कलमाडी यांचे वर्चस्व असलेल्या पुणे शहरात पुढील महिन्यात महापालिका निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जामीन मंजूर होण्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रकुल क्रीडा आयोजन समितीचे महासंचालक व्ही. के. वर्मा यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धा ऑक्टोबर २०१० मध्ये दिल्लीत झाली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजक समिताचे अध्यक्ष सुरेश कलमाडी होते. त्यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे १७०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना २५ एप्रिल २०११ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. न्यायालयाने त्यांची तिहार तुरुंगात रवानगी केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रत्येकवेळी त्यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता. कलमाडी हे राजकीय नेते असून ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतील, असे सांगून उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर करीत होते. त्यामुळे कलमाडी गेली नऊ महिने ते तिहार तुरुंगाच्या मुक्कामी होते.
दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी कलमाडी यांची पाच-पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक दोन जातमुचलक्यावर सुटका केली. क्विन्स बॅटन रिलेच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करुन कलमाडींना अटक करण्यात आली होती. राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घोटाळा केल्याप्रकरणी खासदाराला अटक होण्याची ही देशातली पहिलीच वेळ होती. त्याआधी राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी कलमाडी यांचे सहकारी ललित भानोत (आयोजन समितीचे सरचिटणीस), व्ही. के. वर्मा (आयोजन समितीचे महासंचालक) तसेच कलमाडींचे खासगी सचिव शेखर देवरुखकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रकुल क्विन्स बॅटन रिले आणि टायमर घोटाळा याप्रकरणी कलमाडी यांच्याविरुद्ध सीबीआयच्या हाती ठोस पुरावे मिळाले होते. त्यामुळे सीबीआयने कलमाडींना १२० ब आणि ४२० कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक केली होती. कलमाडींना अटक केल्यानंतर कॉंग्रेसने तात्काळ कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. या प्रकरणातून निर्दोष सिद्ध होईपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे त्यावेळी पक्षाने जाहीर केले होते. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना पक्षाच्या संसदीय समितीच्या सचिवपदावरून काढून टाकले होते.
कलमाडींच्या परतण्याने पुणे काँग्रेसला बळ मिळणार का?
माझे मन आणि बुद्धी आजही ठणठणीत - सुरेश कलमाडी
सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण निर्दोषच : दिग्विजय
अमंलबजावणी संचालनालयाकडून सुरेख कलमाडी यांची चौकशी