आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण्‍ा : कुटुंब व कामातील संतुलनास महिलांचे प्राधान्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील बहुतांश नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी लवचीक वातावरण हवे असते. शिवाय कुटुंब व नोकरीतील संतुलन हेच व्यावसायिक यश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
व्यावसायिक नेटवर्किंग साइट ‘लिंक्डइन’च्या सर्वेक्षणात 94 टक्के भारतीय महिलांनी यशस्वी करिअर सुरू असल्याची भावना व्यक्त केली आहे. जगभरात 63 टक्के महिलांनी घर व नोकरीतील संतुलनाला प्राधान्य दिले. मात्र, भारतीय महिलांनी या घटकाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. 74 टक्के महिलांच्या मते कुटुंब व नोकरीतील संतुलन हेच सर्वकाही आहे. ‘महिलांना कामाच्या ठिकाणी काय हवे?’ या शीर्षकाच्या अभ्यासात महिलांनी व्यावसायिक यशाबाबतच्या संकल्पना स्पष्ट केल्या. नोकरीत सहा वर्षे अनुभव असणा-या महिला त्यापेक्षा कमी अनुभव असणा-या महिलांपेक्षा अधिक समाधानी असतात.

कामाच्या ठिकाणी लैंगिकतेशी संबंध येत असल्याचे तीनपैकी एका नोकरदार महिलेचे म्हणणे आहे. अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. कामाच्या ठिकाणी लवचीकपणा असावा, असे 85 टक्के नोकरदार महिलांचे म्हणणे आहे. व्यावसायिक यश मिळवण्यासाठी नव्या पिढीतील महिला कामातील लवचीकता व नेतृत्वाची संधी या दोन घटकांना महत्त्व देतात.

व्यावसायिक विकासात गुंतवणूक नाही
केवळ मूल आणि मातृत्वासाठी नोकरी सोडून घरी राहणे पसंत करत नसल्याचे 43 टक्के महिलांचे म्हणणे आहे. भारतासह 13 देशांतील 5000 महिलांनी सर्वेक्षणात भाग घेतला. विविध क्षेत्राशी संबंधित गटात 18-65 वयोगटातील 400 महिलांनी मते नोंदवली. महिलांना करिअरमध्ये अद्यापही अडचणी येतात, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. भारतामध्ये व्यावसायिक विकासात गुंतवणुकीचा (48 टक्के) व रोल मॉडेलचा (43 टक्के) अभाव असल्यामुळे महिलांच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण होतो. वेतनातील असमानता व कौटुंबिक सुखावर व्यावसायिक यश अवलंबून आहे.

कुटुंब व कामात संतुलन राखत भारतात उद्यमशीलता वाढीचे लक्षण सुखावह असल्याचे लिंक्डइन इंडियाच्या प्रमुख दीपा सापटणेकर यांनी सांगितले. भारतातील नोकरदार महिलांना अन्य देशांच्या तुलनेत लैंगिकतेशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत भारतीय महिला आत्मविश्वासाने आपले करिअर करतात, असे सापटणेकर म्हणाल्या.