आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीडचे काम कौतुकास्पद: सुशीलकुमार शिंदे यांचे टीकाकारांना चोख उत्तर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नॅशनल ग्रीड बंद पडल्यानंतर 22 राज्यांत काळोख पसरला असताना गृहमंत्रिपदावर बढती मिळालेले मावळते ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज टीकाकारांना अमेरिकेचे उदाहरण देऊन गप्प केले. अमेरिकेत वीज यंत्रणा ठप्प झाल्यानंतर लाइट येण्यास चार दिवस लागतात.आपण अवघ्या काही तासांत वीज पुरवठा सुरळीत केला. त्याबद्दल जनतेने पॉवर ग्रीडचे कौतुक करायला हवे, असे शिंदे म्हणाले.
मंगळवारी मंत्रिमंडळात किरकोळ खांदेपालट केल्यानंतर आज सुशीलकुमार शिंदे यांनी गृहखात्याचा, पी.चिदंबरम यांनी अर्थखात्याचा पदभार स्वीकारला. शिंदे यांच्या पदोन्नतीमुळे वीरप्पा मोईली यांच्याकडे ऊर्जा खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मोईली सध्या केंद्रीय उद्योग व्यवहार खातेही सांभाळतात. या तिन्ही मंत्र्यांनी आज आपला पदभार स्वीकारला. सलग दोन दिवस नॅशनल ग्रीड यंत्रणा कोलमडल्याने राजधानी दिल्लीसह 22 राज्ये आणि सुमारे 67 कोटी लोकांना काळोखात बुडाले होते. नेमके त्याच वेळी ऊर्जामंत्री शिंदे यांची गृहमंत्रिपदावर वर्णी लागल्याची घोषणा झाल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. प्रसारमाध्यमांनी मंगळवारी मनमोहन सरकारला धारेवर धरले होते. आज या टीकेला मावळते ऊर्जामंत्री शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आज पत्रकारांनी काळोखाबद्दल छेडताच ते म्हणाले, झाल्या प्रकाराबद्दल पंतप्रधान कार्यालयास माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेत चार दिवस लाइट आले नव्हते. इथे भारतात आम्ही काही तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्याची किमया केली आहे. सन 2003 मध्ये अमेरिकेतील काही राज्यांमध्ये वीज यंत्रणा कोलमडल्यानंर वीजपुरवठा सुरळीत करण्यास चार दिवस लागले होते. याचे उदाहरण शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात दिला होता. सोमवारी पहाटे वीज गेल्यानंतर 15 तासांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. मंगळवारी पुन्हा उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारताचे ग्रीड बंद पडल्यानंतर वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी 20 तास लागले. लागोपाठ दुस-या दिवशी ग्रीड बंद पडल्यानंतर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला या प्रकरणी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते.

हुश्श! अखेर वीज परतली
तब्बल 20 तासांच्या प्रतीक्षेनंतर 22 राज्यांत आज वीजपुरवठा सुरळीत झाला. देशातील सर्वात मोठ्या वीज संकटातून 67 कोटी लोकांची बुधवारी सुटका झाली. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन ग्रीड बंद पडताच अर्धा देश ठप्प झाला होता. रेल्वे सेवा, राजधानीतील मेट्रो सेवेसह उद्योगांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. देशाच्या अनेक भागांत दमट वातावरण असल्याने लोक घामाघूम झाले होते. आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे पॉवर ग्रीडच्या अधिका-यांनी सांगितले. दरम्यान, ग्रीड बंद पडण्याचे नेमके कारण अद्याप सापडलेले नाही. परंतु पूर्व भागातील ग्रीडमधून अधिक वीज खेचल्यानेच हे संकट निर्माण झाल्याचा संशय आहे.

चिदंबरम यांच्याकडे लक्ष
सुमारे साडेतीन-चार वर्षांच्या खंडानंतर पी. चिदंबरम यांनी आज पुन्हा अर्थमंत्रालयाची सूत्रे स्वीकारली. चिदंबरम अर्थ खात्यात परतल्यामुळे आज शेअर बाजारही वधारला. सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आव्हान चिदंबरम यांच्यासमोर आहे. अर्थखात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सकाळी चिदंबरम थोडा वेळ गृहमंत्रालयात जाऊन आले. नंतर त्यांनी अर्थखात्याची सूत्रे स्वीकारण्याची औपचारिकता पूर्ण केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचीही त्यांनी भेट घेतल्याचे कळते. गेल्या नऊ वर्षात विकासदर प्रथमच साडेसहा टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे देशी-विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याची महत्त्वाची जबाबदारी चिदंबरम यांच्यावर येऊन पडली आहे. सन 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर त्यांना अर्थखात्यातून गृहमंत्रिपदावर हलवण्यात आले होते.

खापर फोडून सुरुवात नको : मोईली
दुस-यांवर खापर फोडून कामाची सुरुवात करायची नाही. ग्रीड सुरळीतपणे चालण्यास प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल, असे नवनियुक्त ऊर्जामंत्री वीरप्पा मोईली यांनी आज स्पष्ट केले. उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी ग्रीडमधून अतिरिक्त वीज खेचल्यामुळे यंत्रणा कोलमडल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर मोईली यांनी वादात पडण्याचे टाळले.

यूपीवर खापर फोडू नका : अखिलेश
लखनऊ ।उत्तर प्रदेशने ग्रीडमधून अतिरिक्त वीज खेचल्यानेच वीज संकट निर्माण झाल्याचा आरोप मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी फेटाळला आहे. वीज संकटाचे खापर उत्तर प्रदेशवर फोडणे योग्य नाही. हा तपासाचा विषय आहे. यापूर्वीच्या मायावती सरकारने ऊर्जा क्षेत्रात काय दिवे लावले हा प्रश्नच आहे, अशी टीका करून वीज उत्पादन वाढत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या मदतीने वीज उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सौर प्रकल्पाचे कामही सुरू असल्याचे ते म्हणाले.