आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाबला फाशी दिली तेव्हाच म्हणालो होतो, अफझलची फाइल एका दिवसात ओके करीन!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अफझल गुरूला देण्यात आलेल्या फाशीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी ‘दिव्य मराठी नेटवर्क’ने खास बातचीत केली. या संपूर्ण घटनेमागील पट त्यांनी या वेळी उलगडला. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी...
फाशीच्या वेळेबाबत भाजपकडून टीका होत आहे. संसद अधिवेशनापूर्वीच असे का?
शिंदे : हे काही राजकीय प्रकरण नाही. राजकीय बाबींवरील लढाई त्याच व्यासपीठावरून आम्ही लढू. अफझलची फाइल हाती येताच उशीर न लावता ती ओके करीन, असे मी अजमल कसाबला फाशी दिली गेली त्याच दिवशी म्हणालो होतो. सगळ्या न्यायालयांनी निकाल दिला होता. अफझलची फाइल 2011 मध्ये राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती. राष्ट्रपतींनी पुन्हा ती आमच्याकडे पाठवली. त्यावर संपूर्ण माहिती मी त्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून लावला. नंतर फक्त दिवस मुक्रर करणेच बाकी होते.

हिंदू दहशतवादाबाबतचे आपले वक्तव्य भाजपकडून मुद्दा करण्यात येत आहे.
शिंदे :
भारतात कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. दहशत पसरवणारा कोणीही असो, ठोस प्रत्युत्तर दिले जाईल. दहशतवादाला ना कोणता रंग असतो, ना धर्म, ना रूप आणि जातही नसते. त्यामुळे त्याविरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाईल.

कसाबपाठोपाठ दीड महिन्यातच दुसरी फाशी दिली गेली. या निर्णयाची माहिती पक्षाला होती काय?
शिंदे :
हे बघा, हा पूर्णपणे प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय आहे. काँग्रेस पक्ष कायम दहशत पसरवणा-यांच्या विरोधातच राहिलेला आहे.

फाशीनंतर काश्मीर खो-यात खळबळ आहे?
शिंदे
: शांतता अबाधित राखण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न केले जातील. देशातील जनतेला आणि विशेषकरून काश्मीरच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन आहे.

संसदेचे हल्लेखोर, कट रचणा-यांना शिक्षा झाली. ती घटना आपल्या कशी स्मरणात आहे?
शिंदे :
लोकशाहीच्या सर्वोच्च स्थळावरील तो हल्ला होता. त्या वेळी मी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येच होतो. अचानक सगळी दारे बंद झाली. दहशतवादी आत येतील असे वाटत होते आणि त्याच वेळी मला हल्ल्याच्या गांभीर्याबाबत माहिती मिळाली. दहशतवाद्यांना देशाने आज कठोर संदेश दिला आहे.