आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देशाच्या सुरक्षेऐवजी गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही, अशी स्तुतीसुमने वाहत दलित कार्ड बाहेर काढले.
निम्मा देश अंधारात असताना त्यांनी ब्लॅक आऊट विषयाला बगल देत सोनिया गांधी व मनमोहनसिंग यांची तारीफ केली. ते म्हणाले, गृहमंत्रालयासारखे खाते दलितांना दिले जात नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पण राजीव गांधी पहिले पंतप्रधान ठरले होते ज्यांनी देशाला पहिला दलित गृहमंत्री देताना बूटा सिंग यांना संधी दिली होती. देशाच्या इतिहासात आता दुस-यांदा सोनिया गांधी यांच्यामुळेच माझ्यासारख्या दलिताला संधी देण्यात आली. गृहमंत्रालय हे आव्हानात्मक व अडचणीचे मंत्रालय असते. त्याची व्याती व जबाबदारी मोठी असते, असे सांगत माझ्यासाठीही मोठी जबाबदारी आहे, असे शिंदे यांनी म्हटले. दरम्यान, ब्लॅक आऊटबाबत बोलताना ते म्हणाले, असे प्रसंग घडत असतात. भारतातच नव्हे तर अमेरिकेतही ४-४, ५-५ दिवस ब्लॅक आऊट होतो, असे सांगून या विषयाला बगल दिली.
याबाबत ते विस्ताराने म्हणाले, मी प्रथम सोलापूरकर जनतेचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच मला काम करण्याची संधी मिळते आहे. आज देशापुढे अनेक समस्या आहेत त्याबाबत प्रथम संपूर्ण माहिती घेईन. मगच त्यावर प्रतिक्रिया देईन. आज देशात नक्षलवाद फोफावलेला आहे. दहशतवादाची सर्वाधिक झळ आपल्याला बसत आहे. अंतर्गत वाद, जातीय तेढ, राज्या-राज्यांची तेढ, शेजारील राष्ट्रांकडून बसणारी झळ यासारखे अनेक विषय आहेत.
सुशीलकुमार शिंदेंकडे गृह खाते, पी. चिदंबरम नवे अर्थमंत्री
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.