आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफझलचा मृतदेह देण्याबाबत अनिश्चितता; केंद्राच्‍या भूमिकेत मतैक्याचा अभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/श्रीनगर - संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यावरून सोमवारी दिवसभर केंद्र सरकार भूमिका बदलत राहिले. दिवसा गृहमंत्रालयाच्या अधिका-यांनी मृतदेह सोपवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. सायंकाळी यावर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, ‘याचा निर्णय संसदच घेईल.’ यानंतर थोड्याच वेळात पीएमओने डॉ. सिंग यांचे वक्तव्य मागे घेतले. शेवटी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार किंवा नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

गृहमंत्रालयाचे प्रवक्ते कुलदीपसिंह धतवालिया यांनी अफझलचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याचा प्रस्ताव जम्मू-काश्मीर सरकारने पाठवला असल्याचे म्हटले होते. दरम्यान, काश्मीर खो-यात संचारबंदी शिथिल केल्यानंतर सोमवारी उग्र निदर्शने झाली. त्यामुळे पुलवामात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली.

बाजारपेठा उघडल्या मात्र...

अफझलला फाशी दिल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या दहा जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारपासून काही अंशी शिथिल करण्यात आली. सोमवारी बाजारपेठा उघडल्या पण पुलवामाध्ये लोकांनी दगडफेक केली. सोपोर, कुलगाम, श्रीनगर, बडगाममध्येही निदर्शने करण्यात आली. त्यामुळे पुलवामात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, हुरियत नेता सय्यद अली शाह गिलानी याने शुक्रवारी काश्मीर बंदचे आवाहन केले आहे.

तुरुंग संहितेत तरतूद- तुरुंग संहितेचा विचार करता अफझलचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला जाऊ शकतो. तिहार तुरुंगाच्या अधिका-या नुसार, फाशी दिल्यानंतर संबंधिताचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवावाच लागतो. मात्र, अफझलचे प्रकरण संवेदनशील आहे. यामुळे सरकार जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी होईल.