आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taking Bribe 72 Lakhs\'s Tyagi Family Inquaried ; Money Divert From Abroad

72 लाखांची लाच घेणा-या त्यागी कुटुंबीयांची चौकशी ;विदेशातून लाचेची रक्कम वळवली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 3600 कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) बुधवारी माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागींसह त्यांच्या चुलत भाऊ-बहिणीची चौकशी केली. इटलीतील अहवालात त्यागी कुटुंबाला 72 लाख रुपये लाच दिल्याचा आरोप आहे.

युरोपीय मध्यस्थ कार्लो गेरोसा व गिडो हॅशेख यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून जुली व डोक्सा त्यागी यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी 3.00 वाजता त्यागी सीबीआयच्या मुख्यालयात आले तेथे त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. इटालियन हेलिकॉप्टर निर्माती कंपनी ऑगस्टालँडला कंत्राट मिळावे यासाठी युरोपीय मध्यस्थ कार्लो गेरोसा आणि गिडो हॅशेख यांनी लाच दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने त्यागी यांची चुलत बहीण जुली व बंधू डोक्सा यांच्या कार्लो तसेच हॅशेख यांच्या संबंधाबाबत चौकशी केली. इंजिनिअरिंगचा ठेका देण्याच्या बहाण्याने मॉरिशियस व ट्युनेशियामार्गे लाचेची रक्कम वळवल्याप्रकरणी एअरोमॅट्रिक्सचे अधिकारी व आयडीएस इन्फोटेक कंपनीच्या अधिका-यांची सीबीआयने चौकशी केली आहे. इटालियन वकिलाच्या अहवालात गेरोसा आणि हॅशेख यांचे त्यागी यांच्या कुटुंबीयाशी विशेषत: तीन चुलत भाऊ-बहीण जुली, डोक्सा आणि संदीपबरोबर चांगले संबंध होते, असे नमूद करण्यात आले आहे.

कंपनी अनुरूप कंत्राटातील अट बदलली
हॅशेख व गेरोसा यांनी त्यागी बंधूंशी संधान साधून हेलिकॉप्टर कंत्राटातील नियम आपल्या अनुकूल करून घेतले. व्हीव्हीआयपींसाठी 18000 फूट उंचीवर उडण्यास सक्षम हेलिकॉप्टरची अट घालण्यात आली होती. त्यात बदल करून उंची 15000 फुटांवर आणण्यात आली. यामुळे ऑगस्टालँड कंपनीला निविदा प्रक्रियेत भाग घेता आला. या दोघांनी नादुरुस्त इंजिन असलेल्या एका हेलिकॉप्टरची चाचणी करून घेतली. त्यामुळे आपोआप तीन इंजिनची हेलिकॉप्टर निर्मात्या ऑगस्टालॅँड कंपनीला ठेका मिळाला.

इटलीच्या संबंधित दोन कंपन्यांच्या दोन सीईओंना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी ऑगस्टालँड व गॉर्डियन सर्व्हिसेस सार्ल्समधील करारानुसार मध्यस्थाला 4 लाख युरो (2.8 कोटी रु.), तर त्यागी बंधूंना 72 लाख रुपये दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संरक्षण खर्चातील कपातीचा परिणाम होणार नाही : अँटनी
संरक्षण खर्चात 14000 कोटी रुपये कपात केल्यामुळे लष्कराच्या क्षमतेवर कसलाही परिणाम होणार नाही. आवश्यकता भासल्यास महत्त्वाची शस्त्रसामग्री खरेदी केली जाईल, असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी म्हटले आहे. लष्कराच्या शस्त्र सिद्धतेबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे अँटनी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. संरक्षण विभागाच्या महसूल खर्चात 4,903.77 कोटी, तर भांडवली खर्चात 10,000 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या तुलनेत चीनचा संरक्षण खर्च कमी : मिडीया
बीजिंग । चीनचा संरक्षण खर्च अमेरिकेच्या तुलनेत कमी असल्याचे चिनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. चीनने संरक्षण खर्चासाठी 115.7 अब्ज डॉलरची तरतूद केली आहे. अमेरिकेने संरक्षण खर्चासाठी 700 अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. संरक्षण खर्चातील 10.7 टक्के वाढ चीनच्या गेल्या दोन वर्षांतील विकास दरातील घसरण दर्शवते, असे चायना डेलीच्या वृत्तात म्हटले आहे.