आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौरऊर्जेने पाणी शुद्धीकरण: रायपूरच्या संशोधकाने शोधले अभिनव तंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छग)- समुद्रातील खार्‍या पाण्याचे, तसेच तलाव आणि नाल्यांमधील दूषित पाण्याचे शुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आधुनिक तंत्र रायपूर येथील संशोधक डॉ. अनिल तिवारी यांनी शोधून काढले असून, या संशोधनाचे देश-विदेशातील शास्त्रज्ञांनी कौतुक केले आहे.
रायपूर एनआयटी मध्ये मेकॅनिकल विभागात सहयोगी प्राध्यापक असलेल्या डॉ. तिवारी यांनी 26 आणि 27 मे रोजी थायलंडमध्ये शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत यासंबंधी सादर केलेल्या रिसर्च पेपरला उत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कारही मिळाला आहे. सौर ऊर्जेने पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे हे तंत्र देशातील ग्रामीण भागांत उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. सूर्याच्या उष्णतेने हवा गरम करून त्याद्वारे दूषित पाण्याचे बाष्पीभवन आणि द्रवीभवनाचे हे तंत्र यापूर्वी शोधलेल्या तंत्रांपेक्षा आठपट जास्त उपयुक्त आहे. सौर ऊर्जेने पाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या जुन्या तंत्रात पाणी गरम करून त्याची वाफ केली जाते.
मात्र नव्या तंत्रात पाण्याऐवजी हवा गरम केली जाते. या तंत्रात एक चौरस मीटर सोलर प्लेट ताशी पाच लिटर पाणी शुद्ध करते. सौर ऊर्जेबाबत डॉ. तिवारी यांच्या संशोधनपत्रांना यापूर्वी 2005 मध्ये यूएसएच्या फ्लोरिडा ओरलँडो येथे आयोजित अमेरिकन सोलर एनर्जी सोसायटी आणि 2010 मध्ये मॉरिशसमध्ये आयोजित इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ एन्व्हायरन्मेंटल रिसर्च कॉन्फरन्समध्येही मान्यता मिळाली आहे.

असे आहे तंत्र

डॉ. तिवारी यांनी विकसित केलेले तंत्र सक्रिय आणि निष्क्रिय उध्र्वपातनावर आधारित आहे. जुने तंत्र निष्क्रिय उध्र्वपातनावर आधारित आहे. त्यात पाण्याचे थेट बाष्पीभवन केले जाते. नव्या तंत्रात पाण्याऐवजी हवा डबल पास फ्लॅट प्लेट सोलर एअर हीटरमध्ये गरम केली जाते. ही हवा वर आणि खाली असलेल्या दोन्ही चॅनलमधून गरम होऊन आद्र्रता कक्षात पोहोचते. तेथे ही हवा समुद्रातील पाण्यातून बाष्प शोषून घेते. नंतर या हवेतून दुसर्‍या एका कक्षात डिसह्युमिडिफिकेशन तंत्राने शुद्ध पाणी मिळते. जल बाष्प शोषून घेण्याची हवेची क्षमता जास्त असल्याने या तंत्राने कमी वेळेत जास्त पाणी मिळते. दूषित पाणी पुन्हा टाकीत जाते. ते रिसायकल करून पुन्हा वापरता येते.