आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कराटे गर्लने केली सडक सख्याहरींची धुलाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छग)- मुलींची छेड काढण्याचे उद्योग करणा-या रायपूरमधील चार मुलांना शनिवारी एका कराटे गर्लने चांगलाच इंगा दाखवला. 16 वर्षांची आकांक्षा गौते आपल्या वडिलांसोबत घरी जात असताना चार टारगट मुलांनी गाड्या आडव्या लावून त्यांचा रस्ता रोखला. त्यांनी काही करायच्या आतच आकांक्षाने रौद्ररूप धारण करीत तिघांची धुलाई केली. तिची हिंमत पाहून चौथा मुलगा पळून गेला आणि पळण्याचा प्रयत्न करणा-या या तिघांना जमावाने पकडले.
रायपूरमधील गुढियारी भागात राहणारी आकांक्षा आदर्श स्कूलमध्ये अकरावीत शिकते. तिने ब्लॅक बेल्टपर्यंत कराटेचे प्रशिक्षण घेतलेले आहे. शनिवारी रात्री 12 वाजता वडील भुवनेश्वर गौते यांच्यासोबत ती घरी येत होती. दरम्यान, एका चौकातून दोन बाइकवरील चार मुलांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गुढियारीच्या उड्डाण पुलाजवळ पोहोचताच चौघांनीही आपल्या गाड्या गौते यांच्यासमोर आडव्या लावल्या. तेव्हा आकांक्षाने चपळाईने वडिलांच्या गाडीवरून उडी मारली आणि समोर आलेल्या दोघांना पंच आणि किक मारून बेशुद्ध केले. दरम्यान, भुवनेश्वर यांनीही दुस-या बाइकवरील एकाला पकडून ठेवले होते. मुलगी आणि वडिलांचा हा पवित्रा पाहून चौथ्या मुलाने तेथून धूम ठोकली. ही मारामारी सुरू असताना आसपासचे लोकही तेथे जमा झाले आणि राजेंद्र मिश्रा, सुरेंद्र द्विवेदी, सुनील जायसवाल या तिघांना पकडले. पोलिसांना कळवल्यानंतर थोड्याच वेळात या तिघांनाही अटक करण्यात आली. फरार झालेला विनोद नावाचा तरुण 24 तासांनंतरही पोलिसांना सापडलेला नाही.

पोलिसांनी केली उलटतपासणी
आकांक्षा आणि तिचे वडील भुवनेश्वर गौत यांनी तीन तरुणांना पकडल्यानंतर पोलिस कंट्रोल रूमला फोन करून मदत मागितली. पोलिसांची पीसीआर व्हॅन क्रमांक-4 तेथे आली. त्यातील एक अधिकारी दारूच्या नशेत होता. त्याने गौते यांचीच उलटतपासणी करीत विचारले की, एवढ्या रात्री तुम्ही काय गुंडगिरी माजवली आहे? पोलिसांचे हे वागणे पाहून जमाव बिथरला आणि पोलिसांच्या पीसीआर व्हॅनने तेथून पळ काढला. नंतर गंज ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना अटक केली.

कराटे चॅम्पियन आकांक्षा
अकरावीत शिकणारी आकांक्षा म्युथाई आणि कराटेची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. ब्लॅक बेल्टमध्ये तिने बंगळुरू येथील स्पर्धेत यश मिळवले आहे. तिसरीत असल्यापासूनच ती कराटे शिकत आहे. तिचा भाऊ अखिलेशही तिच्यासोबत कराटे शिकतो. आकांक्षाची आई ज्योती यांना आपल्या मुलीच्या शौर्याचा विलक्षण अभिमान वाटतो. तिच्या वडिलांनी सांगितले की, त्या मुलांनी पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हाच त्यांनी मुलीला त्यांचा सामना करण्याची सूचना दिली होती. त्यामुळे त्यांच्यासमोर गाड्या आडव्या लावताच मुलीने एकदम त्यांच्यावर हल्ला चढवला. आकांक्षा म्हणाली की, प्रत्येक मुलीने अशा परिस्थितीला धैर्याने तोंड दिले पाहिजे. किमान हिंमत दाखवली तरी गुंडांचे मनोधैर्य ढासळते.