आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद- स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री म्हणून पी. चिदंबरम व सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या फसव्या आश्वासनांची चौकशी करण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिका-यांनी दिले आहेत.
रंगारेड्डी जिल्ह्याचे दंडाधिकारी यू.डी. दुर्गाप्रसाद यांनी शिंदे व चिदंबरमविरोधातील आरोपाची चौकशीचे निर्देश देत 14 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्यास पोलिसांना सांगितले आहे. तेलंगणा ज्युनियर अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेशकुमार यांच्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आले. या मंत्र्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिंदे, चिदंबरम यांच्या आश्वासनाची चौकशी कलम 420 अंतर्गत केली जावी, अशी मागणी कुमार यांनी न्यायालयाकडे केली.
गतवर्षी 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीत शिंदे यांनी महिनाभरात निर्णयाचे आश्वासन दिले. ही मुदत आज संपल्यानंतर शिंदे यांनी आणखी अवधी लागेल, असे म्हटले. 9 डिसेंबर 2009 रोजी विधानसभेचा ठराव मंजूर झाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल, असे आश्वासन गृहमंत्री चिदंबरम यांनी दिले. 23 डिसेंबर 2009 रोजी सर्वांची मते विचारात घेतली जातील, असे ते म्हणाले होते.
काँग्रेस खासदारांचा इशारा : सरकारकडून सुरू असलेल्या टोलवाटोलवीचा निषेध म्हणून तेलंगणाशी संबंधित काँग्रेसच्या सात खासदारांनी पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी बैठक घेऊन त्यांनी हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाला कळवला आहे. मंगळवारी ते राजीनामे पक्षाकडे पाठवून देतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.