आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा समर्थकांनी प्रणवदांना घेरले

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील काँग्रेस, यूपीए आघाडीचे उमेदवार प्रणव मुखर्जी हे प्रचाराच्या दुस-या टप्प्यात हैदराबाद येथे आले असता रविवारी त्यांना तेलंगणा समर्थकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न करून स्वतंत्र राज्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला. राज्यातील काँग्रेस आमदारांनी या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, शहरातील ज्युबिली हॉल येथे आयोजित कार्यक्रम संपवून प्रणवदा बाहेर पडताच त्या ठिकाणी आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी प्रयत्न करून ही आग वेळीच नियंत्रणात आणली.
प्रणवदा जेथे जेथे जातील तेथे तेलंगणा समर्थकांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु कडक बंदोबस्तामुळे प्रणवदांचा दौरा सुरळीत पार पडला. तेलंगणा समर्थकांचे म्हणणे असे होते की, स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा प्रश्न उपस्थित झाला त्या वेळी त्यावर निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट उपसमितीची स्थापना करण्यात आली होती. प्रणव मुखर्जी त्या समितीचे अध्यक्ष होते व त्यांनी स्वतंत्र राज्याच्या निर्मितीस विरोध केला होता. त्यामुळे या मुद्द्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तेलंगणा समर्थकांनी केली आहे. राष्ट्रपतिपदाबाबत आंध्रातील राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका जाहीर न केल्याने त्याबाबत उत्सूकता कायम आहे. मुखर्जी रविवारी शहरात आले होते. ज्युबिली हॉलमध्ये राज्यातील काँग्रेसचे खासदार,आमदार व विधान परिषद सदस्यांनी प्रणवदांसोबत चर्चा केली. मुखर्जी यांना तृणमूल काँग्रेस वगळता अन्य सर्व पक्षांनी समर्थन केले आहे. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष तसेच जनता दल (संयुक्त) शिवसेना, माकपनेही समर्थन जाहीर केले आहे. तथापि आंध्र प्रदेशातील तेलगू देसम, तेलंगणा राष्ट्र समिती खासदार जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने त्यांची भूमिका जाहीर केली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या राज्यांतील नेते, पदाधिका-यांसोबत चर्चा करून मुखर्जी ज्युबली पार्कमधून बाहेर पडल्यावर त्या ठिकाणी आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु स्टेशनरी कक्षात ही आग लागली. अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी ही आग नियंत्रणात आणली.

चमत्कारांवर विश्वास नाही
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील प्रणवदांचे प्रतिस्पर्धी पी. ए. संगमा यांनी या निवडणुकीत चमत्कार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याबाबत प्रणव मुखर्जी म्हणाले,‘आपला चमत्कारांवर विश्वास नाही. कुठला चमत्कार होईल किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही.’ ‘मी सर्व पक्षांकडून पाठिंब्याची अपेक्षा करतो. ज्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही त्यांनी तसा निर्णय घ्यावा.’