आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास या आठवड्यापासून सुरूवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासह अनेक वादग्रस्त मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी चालवली असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होणार आहे.

विरोधी पक्षातील उजव्या आणि डाव्यांनी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. या घोटाळ्याबरोबरच भ्रष्टाचार, महागाई आणि अन्य आर्थिक मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. काँग्रेसशी संलग्नित इंटकसह अन्य ट्रेड युनियन्सनी महागाई आणि कामगार कायद्याच्या उल्लंघनाच्या मुद्यावर 20 व 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यांनी सरकारवर ‘अकार्यक्षमते’चा ठपका ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांना आयतेच बळ मिळाले आहे. गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीसमोरील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याअभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी 12 हेलिकॉप्टर खरेदीसाठी झालेल्या करारात 360 कोटी रूपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे.

सरकारवर ‘अकार्यक्षमते’चा ठपका
भाजप, एनडीएची मंगळवारी बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भूमिका ठरवण्यासाठी भाजप संसदीय पक्षाची मंगळवारी बैठक होत आहे. त्यानंतर लगेचच एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखण्यात येणार आहे, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

26फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्याच्या दुस-या दिवशी आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले जाईल.
28 ।फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री पी. चिदंबरम 2013-14 चाअर्थसंकल्प सादर करणार आहेत.
हे आहेत वादग्रस्त मुद्दे
* हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याबरोबरच महिलांची सुरक्षितता
* प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेली भारतीय जवानांची हत्या
* डिझेल आणि पेट्रोलची दरवाढ, रेल्वेची प्रवाशी भाडेवाढ
* स्वतंत्र तेलंगणाची निर्मिती आणि शेतक-यांच्या कर्ज माफीतील घोटाळा या मुद्यावर सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे टार्गेट
हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य करून गहजब निर्माण करणारे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजप बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळीच भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यत आहे. भाजपचे नवे अध्यक्ष राजनाथसिंग हेच हा मुद्दा उचलणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शन प्रस्तावावेळी सुरुवातही राजनाथच करणार असल्याचे समजते.