आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - येथे नुकत्याच पार पडलेल्या ओसियान सिनेफॅन महोत्सवात तुर्की, इराण व मोरोक्कोमधील चित्रपटांनी पुरस्कारांवर आपले अधिराज्य गाजवले. सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री हे पुरस्कार अरब सिनेसृष्टीने पटकावले.
इराणचे फौझी बेसैदी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या ‘डेथ फॉर सेल ’ या चित्रपटासाठी बेसैदी यांना हा पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही इराणला मिळाला. तारानेह अलीदोस्ती या अभिनेत्रीला हा पुरस्कार मिळाला. मनी हाघीघी हा कलाकार उत्कृष्ट अभिनेता ठरला.
समीक्षेचा विशेष पुरस्कार वर्गात ‘पोस्टकार्डस फ्रॉम द झू ’या इंडोनेशियाच्या तर ‘मिलोक्रोझ : अ लव्ह स्टोरी’ या जपानी चित्रपटांचा गौरव करण्यात आला. फीचर स्पर्धेत देखील तुर्कीश चित्रपटाने पुरस्कार मिळवला. ‘बियाँड द हिल ’ने हा गौरव मिळवला. एलमिन अल्पर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या वर्गवारीत थायलंडच्या ‘इन एप्रिल फॉलोइंग इयर देअर वॉज अ फायर ’ या चित्रपटानेही पुरस्कार मिळवला.
स्वत:शी खोटे बोलणारा व्यक्ती बाह्य जगाशी खोटे बोलणा-या व्यक्तीपेक्षा स्वत:ची अधिक फसवणूक करत असतो, असा संदेश बियाँड द हिल चित्रपटातून देण्यात आला आहे. तुर्कीच्या ‘सायलंट’ या 14 मिनिटांच्या चित्रपटाला उत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेची कथा यात दाखवण्यात आली आहे. ती तुरूंगात असलेल्या पतीला भेटण्यासाठी जाते. परंतु तुरुंगात केवळ तुर्कीश भाषा बोलण्यास परवानगी असते. दुर्देव येथेच आड येते. तिला मात्र कुर्दीश भाषा येत असते. त्यामुळे तुरूंगात पतीशी ती साधा एक शब्द देखील बोलू शकत नाही, असा चुटपूट लावणारा, ह्रदयस्पर्शी विषय यातून हाताळण्यात आला आहे. ‘द बस ’ या आणखी एका तुर्की चित्रपटाने विशेष वर्गात पुरस्कार मिळवला. या चित्रपटाचे परिक्षण चित्रपट निर्माते पानाह पानाही (इराण), अश्विन कुमार, उमेश कुलकर्णी यांनी केले.
‘इनसाइड’चा गौरव - तुर्कीने तयार केलेल्या इनसाइड या चित्रपटाला समीक्षकांकडून दाद मिळाली. समीक्षकांनी या चित्रपटाला सर्वाेत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडले. ज्युरी सदस्यांत मार्का मुलर (रोम), मुझफ्फर अली, अली मोस्तफा (इराण), मागदी अहमद अली (इजिप्त), जेम्स हार्त (अमेरिका) यांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.