आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परवाने घेऊनही टीव्ही वाहिनी सुरू न करणार्‍या वाहिन्यांना इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दूरचित्रवाणी वाहिनीचा परवाना घेऊन प्रसारण सुरू न करणार्‍या वाहिन्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने पाच वाहिन्यांचे परवाने रद्द केले आहेत. परवाना मिळाल्यानंतर एक वर्ष उलटूनही या वाहिन्यांनी प्रसारण सुरू केले नव्हते.
एक वर्षापूर्वी परवाने दिलेल्या आणि प्रसारण सुरू न केलेल्या अशा अनेक वाहिन्यांची यादी मंत्रालयाने तयार केली आहे. या यादीत सुमारे 37 वाहिन्या आहेत. प्रसारणातील विलंबाबाबत स्पष्टीकरण द्या, अन्यथा परवाने रद्द केले जातील अशी तंबीच या वाहिन्यांना मंत्रालयाने दिली आहे.
यातील तीन वाहिन्यांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे, तर 27 वाहिन्यांनी प्रसारण सुरू करण्यासाठी अजून थोडा वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. मंत्रालय या विनंतीवर विचार करीत असून, दोन वाहिन्यांचे परवाने त्यांच्या मालकांच्या सांगण्यावरून परत घेण्यात आले आहेत.
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 116 वाहिन्यांना परवाने दिल्यानंतरही त्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. मात्र अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंगच्या नव्या धोरणानुसार कोणत्याही वाहिनीला परवाना मिळाल्यानंतर प्रसारण सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त एक वर्ष कालावधी दिला जातो. अपलिंकिंग आणि डाउनलिंकिंगचे नवे धोरण डिसेंबर 2011 पासून लागू आहे. देशात सध्या 681 दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रसारण होत आहे. मंत्रालयाने या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकूण 825 वाहिन्यांना प्रसारणाचे परवाने दिले होते.
2008 मध्ये 160 परवाने - नव्या वाहिन्यांसाठी परवाने मिळवण्यासाठी मंत्रालयाकडे येणार्‍या अर्जांची संख्या थोडी घटली आहे. 2008 मध्ये तर सर्वाधिक 160 वाहिन्यांना प्रसारणाची परवानगी देण्यात आली होती. वाहिन्यांची ही गर्दी पाहून देशात इतक्या वाहिन्यांची आवश्यकता आहे का आणि त्यासाठी स्पेक्ट्रम उपलब्ध आहे का ते सांगावे, असा सल्ला माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसारण क्षेत्रातील नियामकांना सुमारे दोन वर्षांपूर्वी पत्र लिहून मागितला होता.