आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Upa President Candiates Pranab Says Congress Is Everything

काँग्रेस माझा सांगाती! प्रणवदांचे जाता जाता असेही पक्षकार्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यूपीए आघाडी व सत्ताधारी काँग्रेसचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी हे सध्या वेगवेगळ्या राज्यांत फिरून प्रचारमोहीम राबवत आहेत. पण हे कार्य करत असताना ते त्या राज्यातील पक्षाचे पदाधिकारी व नेत्यांची आवर्जून भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत असल्याने त्यातून पक्षाचाही प्रचार होत आहे. यानिमिताने काँग्रेसने पदाधिकार्‍यांना एकात्मतेचा संदेश दिला असून त्याचा लाभ त्यांना आगामी राज्यांच्या निवडणुकीत होऊ शकतो.
प्रणव मुखर्जी राज्यांचा दौरा करून तेथे प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. या दौर्‍याच्या अनुषंगाने काँग्रेसने त्या राज्यांच्या प्रभारी नेत्यांवर दौर्‍याच्या समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे. प्रणवदा संबंधित राज्यांमधील प्रमुख नेते, पदाधिकार्‍यांना भेटत आहेत. सर्वांनी एकजूट व्हावे व एक एक मताचे महत्त्व ध्यानात घेऊन ते जोडण्यावर भर द्यावा, असे निर्देश पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पदाधिकार्‍यांना दिले आहेत. या वर्षाखेरीस गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच पुढील वर्षाच्या सुरुवातीला मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानसह काही राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महागाई, भ्रष्टाचार व इतर अनेक मुद्दय़ांवर काँग्रेसची अवस्था नाजूक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतिपदाची निवडणूक व प्रचार अभियानाकडे काँग्रेस एकजुटीची संधी म्हणून बघत आहे. कुठल्या राज्यात प्रणवांना कसा प्रतिसाद मिळतो आहे याचा फीडबॅक पक्षाच्या प्रभारींच्या माध्यमातून हायकमांडपर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोचवला जात आहे व त्यात बदलही करण्यात येत आहेत.
काँग्रेसी नेते भांडले- निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मध्य प्रदेशात आलेल्या प्रणवदांच्या उपस्थितीतच पक्षाचे नेत्यांनी एकमेकांवर आरोप करून मतभेदांचे जाहीर प्रदर्शन घडवले. बैठकीचे सूत्रसंचालन करण्याच्या मुद्दय़ावर प्रदेशाध्यक्ष कांतीलाल भुरिया यांना विधिमंडळातील पक्षप्रतोद एन.पी. प्रजापती यांनी नाराजी व्यक्त केली, तर आमदार महेंद्रसिंह कालखेडा व प्रभुदयाळ गहलोत व इतर काही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली व मिशन एकतेला तडा गेला.
उत्साहवर्धक फीडबॅक- राष्ट्रपती निवडणुकीसाठी काँग्रेसच्या रणनीती टीमचे सदस्य असलेल्या एका नेत्याने सांगितले की, काँग्रेसच्या निवडणूक वॉररूमला विविध राज्यांमधून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. ज्या पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत तेथे प्रणवदांना अपेक्षानुरूप प्रतिसाद मिळालेला नाही, परंतु अन्य ठिकाणी मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. प्रणवदांचा या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जात आहे. त्याचा तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला उत्तर प्रदेशात सपा, बसपा, बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल, मुख्यमंत्री नितीशकुमार, महाराष्ट्रात शिवसेनेचे सर्मथन मिळाले आहे. हा पाठिंबा सद्य:स्थितीत पक्षासाठी टॉनिकपेक्षा कमी नाही, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.