आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Presidential Polls: Mulayam, Mayawati Attend Sonia's Lunch

उपराष्ट्रपतिपद निवडणुक : हमीद अन्सारींचा विजय दृष्टिपथात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती निवडणुकीचे मतदान सुरु झाले आहे. हमीद अन्‍सारी आणि जसवंत सिंग यांच्‍यात थेट लढत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून आज रात्रीच निकाल जाहीर होण्‍याची शक्‍यता आहे. दरम्यान, अन्सारी यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसभेचे नवनियुक्त खासदार सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा हिने मतदान केले.
निवडणुकीच्‍या पूर्वसंध्येला सोमवारी संयुक्त पुरागामी आघाडी (यूपीए) एकसंध दिसली. विशेष म्हणजे मुलायमसिंह यादव आणि मायावती यांनीही यूपीएला पाठिंबा दर्शवला आहे. कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास मुलायमसिंह आणि मायावती या दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली.
हॉटेल अशोकामध्ये स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश राजकारणातील परस्परविरोधी नेते मुलायमसिंह आणि मायावती यानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले. मायावती या सोनिया गांधींजवळ बसल्या होत्या, तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशेजारी मुलायमसिंह होते. मुलायमसिंह आणि मायावती यांनी मात्र एकमेकांना न बोलणेच पसंत केले.
तृणमूल कॉँग्रेसच्या सोमवारी रात्री उशिराच्या बैठकीत यूपीए उमेदवार हमीद अन्सारी यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री सुदीप बंदोपाध्याय आणि सी. एम. जटुआ यांच्यासह अनेक खासदार बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, तृणमूल कॉँग्रेसप्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूपीएचे भोजन टाळले. अन्सारी यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर संसदीय कामकाजमंत्री राजीव शुक्ला म्हणाले की, अन्सारी यांच्यासारख्या चांगल्या उमेदवाराला सर्व जणांचा पाठिंबा मिळतो ही चांगली बाब आहे. बंदोपाध्याय यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सोनिया यांच्यासमवेत स्नेहभोजनास होत्या. कृषिमंत्री शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीबाहेर असल्याने त्यांची अनुपस्थिती होती. दोघांच्या गैरहजेरीतून राजकीय संदेश काढला जाऊ नये, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांनी सांगितले.
यूपीएमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे कारण पुढे करत राष्ट्रवादी कॉँग्रेसने काही दिवसांपूर्वी सरकारसोबत असहकार पुकारला होता. वेळ पडल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचाही इशारा राष्ट्रवादीने दिला होता. कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, अंबिका सोनी आणि राजीव शुक्ला यांनी स्नेहभोजनाच्या ठिकाणी निमंत्रितांचे स्वागत केले. 8 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी दोन दिवस स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. विरोधकांनी उचललेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले.
स्नेहभोजनाला उपस्थितीमागे यूपीएतील असंतोषाचे कारण नव्हे. समाजवादी पार्टी विरोधकाची भूमिका निभावत राहील. मात्र, ठरावीक मुद्द्यावर आमचा सरकारला पाठिंबा राहिल, असे नरेश अग्रवाल म्हणाले.
उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान - 13 वे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. सायंकाळी 6 वाजता मतमोजणी सुरू होईल. सातच्या सुमारास निकाल लागेल. काँग्रेस पुरस्कृत यूपीएचे हमीद अन्सारी यांची निवड निश्चित मानली जाते
उपराष्ट्रपतिपद निवडणुक : जयललिता यांचा जसवंत यांना पाठिंबा
उपराष्ट्रपतिपदासाठी पुन्हा हमीद अन्सारी
उपराष्ट्रपती निवडणूक: जसवंतसिंग विरुद्ध हमीद अन्सारी लढत