आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपतिपद : उमेदवारीचा घोळ; हमीद अन्सारी, गोपाल गांधी, कृष्ण बोस शर्यतीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारीचा घोळ अद्याप सुरूच असून गुरुवारी त्याला नवीन वळण मिळाले. यूपीएचे उमेदवार हमीद अन्सारी यांच्या दुस-या इनिंगसाठी अनुत्सुक असलेल्या तृणमूलने माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांचे नावे पुढे करत नव्या चर्चेला सुरूवात केली आहे. मात्र, हमीद अन्सारी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीवरून तृणमूल काँग्रेसने घेतलेली भूमिका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही घेतल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. तृणमूलने प्रणव मुखर्जी यांना आपला पाठिंबा दिला नाही. त्याप्रमाणेच गांधी यांच्या नावाला प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी युपीए उमेदवारासाठी जनता दल (संयुक्त), माकप, भाकप, तृणमूलचे मन वळवण्यासाठी बुधवारी चर्चा केली. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी देखील चर्चा केल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपती पदासाठी मांडण्यात आलेल्या वेगळ्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसने नाकारल्यापासून बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. त्यांनी एक महिन्यापासून दिल्ली वर्ज्य केली आहे, असे दिसते. कारण ममता या काळात दिल्लीत फिरकल्याही नाहीत. गांधी यांच्या व्यतिरिक्त कृष्णा बोस यांच्या नावाचा प्रस्ताव देखील रॉय मांडण्याची शक्यता आहे. कृष्णा बोस हे माजी खासदार असून सुभाष चंद्र बोस यांचे भाचे आहेत.
केंद्रातील सत्तेमध्ये तृणमूलचा वाटा चांगला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात पक्षाचे 28 खासदार आहेत. युपीएसाठी ही निवडणूक फारशी अवघड नसल्याचा दावा करण्यात येत आहे. 790 खासदारांपैकी 500 खासदार युपीएच्या बाजूने आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दोन वेळा चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.
बिगरकाँग्रेसी कोणत्याही उमेदवाराला आपला पाठिंबा असेल. आम्ही तसे पंतप्रधानांना सांगितले आहे. या पदासाठी वकूब व चांगली पार्श्वभूमी असलेला व्यक्ती हवा, असे माकपचे प्रकाश करात यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी बुधवारी रात्री भाकपचे ए. बी. वर्धन , सुधाकर रेड्डी यांच्याशी देखील चर्चा करून काँग्रेस उमेदवाराला समर्थन देण्याची विनंती केली. 18 जुलै रोजी भाकपची बैठक होणार आहे. त्यात या विषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
जनता दलाने (संयुक्त) राष्ट्रपती निवडणुकीत मुखर्जी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. परंतु आता मात्र उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या घटक पक्षांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी आज रामविलास पासवान, लालप्रसाद यादव या दोन बिहारी नेत्यांची भेट घेतली.
नो ऑप्शन- यूपीएकडून हमीद अन्सारी यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून उभे करण्यात येणार होते, परंतु तसे होऊ शकले नाही. आता उपराष्ट्रपतिपदासाठी त्यांच्याशिवाय दुसरा उमेदवार यूपीएकडे नाही. पर्याय नसल्याने त्यांचेच नाव पुढे करण्यात आले आहे.
सोनियांचे लंच- राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लंचचे आयोजन केले आहे. यूपीएच्या खासदारांसाठी हे लंच आहे. राष्ट्रपति पदाच्या निवडणुकीच्या एक दिवस अगोदर अर्थात 18 जुलै रोजी हे लंच देण्यात येणार आहे.