अहमदाबाद- भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत समालोचन करीत असलेले पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रमीज राजा आणि वसिम अक्रम आता 'कॉमेंट्री' करताना दिसणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंध ताणले असून, त्या पार्श्वभूमीवर या दोघांना पाकिस्तानात जाण्यास सांगण्यात येणार आहे. लाइन ऑफ कंट्रोल (एलओसीवर)वर सुरु असलेला संघर्ष पाहता भारताने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात आयपीएलच्या ९ संघाचा लिलाव होणार आहे. यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळेल असे बोलले जात होते. मात्र, सद्यस्थिती पाहता पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूला खरेदी करण्यास फ्रॅचायची तयार होतील, अशी शक्यता नाही. २००८ मध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये घेतले गेले नव्हते. आयपीएलच्या गव्हर्निंग बॉडीनेही पाकिस्तानच्या खेळाडूंचा विचार करु नये असे म्हटले आहे. याआधी, मंगळवारी हॉकी लीगमध्ये खेळण्यास आलेल्या नऊ पाकिस्तानी हॉकी खेळाडूंना पाकिस्तानात पाठवून दिले होते. आता पुढील वर्षी भारतात होणा-या महिला क्रिकेट विश्व कपमध्ये पाकिस्तानचा संघ भारतात खेळणार का?असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. कारण मुंबईत पाकिस्तान संघाचे होणारे सामने अहमदाबादमध्ये शिफ्ट करण्यासाठी बीसीसीआयने गुजरात क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधला होता. मात्र, गुजरातने त्यास नकार दिला आहे.