आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याचा अपव्यय टाळणारी कल्पना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छग) - सध्या देशभरात बहुतांश ठिकाणी लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. रायपूर शहराची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. शहरातील ठिकठिकाणचे हातपंप व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. मात्र, आठवडी बाजार परिसरातील एका विहिरीला मुबलक पाणी आहे. या पाण्याचा अपव्यय न करता योग्य वापर करण्याचा आदर्शच येथील नागरिकांनी घालून दिला आहे.
दर मंगळवारी व शुक्रवारी या भागात बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी या विहिरीवर एक जाळी बसवण्यात येते. जाळीवर पाण्याची मोठी टाकी ठेवतात व पाण्याच्या मोटारीने विहिरीतील पाणी टाकीत भरले जाते. टाकी भरून वाहू लागली तरी चिंतेचे कारण नाही. कारण टाकीतील पाणी पुन्हा विहिरीतच पडत असते. या टाकीला नळ बसवण्यात आले आहेत. लोक दिवसभर या पाण्याचा पिण्यासाठी व इतर कामांसाठी वापर करतात. परंतु विनाकारण पाणी वाया जाऊ नये याकडे सर्वच नागरिकांचे बारीक लक्ष असते. सुमारे 40 ते 50 फूट खोल असलेल्या या विहिरीत साधारणत: 30 ते 35 फूट पाणी असते. कधी पाणी पातळी खाली जाते तेव्हा टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. दर आठवड्याला या विहिरीची स्वच्छता करून ब्लिचिंग पावडर टाकली जाते.
या विहिरीतील पाण्याचा वापर सर्व कामांसाठी केला जात असल्याने कोणी कचरा टाकू नये याकडे प्रत्येकाचेच लक्ष असते. या भागातील दुकानदार, भेळेची गाडी लावणारे व इतर लोक विहिरीवर लक्ष ठेवतात. कोणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याला परावृत्त केले जाते.