Home »National »Other State» Water Filter Vilaspur

दोन पैशांत शुद्ध पाणी करणारे वॉटर फिल्टर

दिव्य मराठी नेटवर्क | May 15, 2012, 00:12 AM IST

  • दोन पैशांत शुद्ध पाणी करणारे वॉटर फिल्टर

बिलासपूर (छग) - दोन पैशांत एक लिटर पाणी शुद्ध करणारे वॉटर फिल्टर बिलासपूरच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने तयार केले असून यात दहा लिटर ते दोन लाख लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्याची सोय आहे. या फिल्टरची किंमतही बाजारात उपलब्ध इतर वॉटर फिल्टरच्या तुलनेत बरीच कमी आहे.
भुवनेश्वर येथील भारतीय खनिज व पदार्थ तंत्रज्ञान संस्थेने या फिल्टरचा शोध 2007 मध्ये लावला होता. प्लॅस्टिकच्या या फिल्टरची किंमत 700 रुपये आहे. हे जलशुद्धीकरण तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी छत्तीसगड राज्य सरकारने डीआरडीए बिलासपूरच्या कार्यकारी अभियंत्यासह 20 तंत्रज्ञांना भुवनेश्वरला पाठवले होते. हे फिल्टर प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यासाठी भुवनेश्वरच्या संस्थेने परवानगी दिल्यानंतर डीआरडीए बिलासपूरने या फिल्टरचे उत्पादन सुरू केले आहे. लवकरच उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्र घेऊन हे फिल्टर बाजारात आणले जाईल. कार्यकारी अभियंता दीपक जसरोटिया यांनी सांगितले की, भारतीय खनिज संस्था, भुवनेश्वर यांच्याकडून प्रोडक्शन सर्टिफिकेट घेऊन हे फिल्टर बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येईल.
तीन वर्षे चालेल - मातीचा वापर करून बनवलेले हे फिल्टर तीन वर्षे चालते. घरातील दुस-या फिल्टरशीही हे फिल्टर जोडता येते, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बिलासपूरचे कार्यकारी अभियंता दीपक जसरोटिया यांनी दिली.
सामान्यांच्या आवाक्यात - पाणी शुद्धीकरणासाठी या फिल्टरमध्ये लिटरमागे फक्त दोन पैसे खर्च येतो. इतर फिल्टरमध्ये हाच खर्च 20 पैसे ते 2 रुपये येतो. देशातील बारा जिल्ह्यांमध्ये हे वॉटर फिल्टर तयार केले जात असून स्वस्त असल्याने गरिबांनाही ते खरेदी करणे शक्य होईल.

Next Article

Recommended