आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्नांमध्ये सुपरस्टारचे डीएनए होते- डिंपल कपाडिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राजेश खन्ना या नावामागील खरा माणूस कोणालाही ठाऊक नाही. कारण त्यांनी स्वत: त्याला कधीही समोर येऊ दिले नाही. ते एक विशेष व्यक्ती होतेच. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यात ख-या सुपरस्टारचे डीएनए होते, अशा शब्दांत अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी भावना व्यक्त केल्या.
राजेश खन्ना यांना भारतातील पहिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 18 जुलै रोजी मुंबईत झाला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी येथे तीनदिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी कपाडिया बोलत होत्या. सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे.
माझे संपूर्ण आयुष्य मी त्यांच्यासोबत घालवले आहे. लग्न झाले तेव्हा माझे वय सोळा वर्षांचे होते. ते सामान्य नव्हते. त्यांच्यात विशेष व्यक्तीचे गुण होते. त्यांच्याविषयी अनेक गोष्टी सांगता येतील. परंतु एक गोष्ट मला अधिक स्पर्श करते. त्यांच्यात सुपरस्टारचे डीएनए होते, असे मला वाटते.
55 वर्षीय डिंपल यांनी खन्ना यांच्याशी 1973 मध्ये विवाह केला होता. त्यानंतर ही जोडी वेगळी झाली. परंतु त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या काळात ही जोडी पुन्हा एकत्र आली होती. राजेश खन्ना यांच्या नावावर ‘आखरी खत’, ‘आविष्कार’, ‘कटी पतंग’, ‘बावर्ची ’,‘सफर’, ‘आनंद ’ असे हिट चित्रपट आहेत.
हमें तुमसे प्यार ..’- आपल्याला ग्रेसफुल मृत्यू यावा, सर्व चाहत्यांकडून मला असेच प्रेम मिळावे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे एवढे प्रेम दिल्याबद्दल मी सर्व चाहत्यांची आभारी आहे. त्यांना हेच नेहमी हवे होते. ते येथे असते तर त्यांनी ‘हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना ’ हे गाणे नक्कीच गुणगुणले असते, असे डिंपल म्हणाल्या.