आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून राहूल गांधी यांनी रविवारी प्रथमच भाषण केले.अनेक मुद्द्यांवर ते बोलले.भावुकही झाले.आपल्या कुटूंबाच्या बलिदानाची आठवण सांगताच त्यांनी भविष्यातील योजनांवर ही प्रकाश टाकला.राहूल म्हणाले भ्रष्ट लोक भ्रष्टाचार निपटून काढण्याची भाषा करतात आणि महिलांबद्दल अनादराची भावना असलेलेच महिला सबलीकरणावर बोलत राहतात. रोज आपण ही भोंदूगिरी पाहतो आहोत. आज काय परिस्थिती आहे? सामान्य माणसाला राजकारणापासून दूर लोटण्यात आले आहे.
आता सर्वांना सोबत घेऊन परिवर्तन घडवायचे आहे. हे प्रेमाने, सर्वांच्या भावना ओळखून करावयाचे आहे. काँग्रेस एकमेव पक्ष आहे की ज्यात नियम आणि कायदा चालत नाही. नवे नियम काढले जातात, पण कुणीच पाळत नाही. नियम काय सांगतो? नेमके हे कसे चालते? असे कित्येकदा विचारतो पण उत्तर मिळत नाही. मात्र, काहीतरी घडते. निवडणुकीपूर्वी सर्व एक होतात आणि जिंकतातही. ही गांधीजींची संघटना आहे. यात भारताचा डीएनए आहे. या पक्षात आज नियम-कायद्याची गरज निर्माण झाली आहे. नेतृत्व विकासाकडे लक्षच दिले जात नाही. पाच-सहा वर्षांनंतर जर एखाद्या राज्यात मुख्यमंत्री द्यावयाचा असेल तर काय स्थिती आहे? मोजकेच लोक आहेत. एकेकाळी नेहरू, सरदार पटेल, आझाद यांच्यासारखे दिग्गज नेते होते. कोणीही भारताचा पंतप्रधान होण्यास पात्र होता. म्हणूनच देश चालवण्याची क्षमता असलेले 40-50 नेते घडवायचे आहेत. प्रत्येक राज्यात 5-10 मुख्यमंत्री होऊ शकतील असे नेते हवेत.
निवडणुकीत तिकीट दिले जात असताना जिल्हा कमिट्यांना विचारले जात नाही. संघटनेतही कोणाचा सल्ला घेतला जात नाही. मग इतर पक्षातील लोक पुढे येतात. उभे राहतात. पराभूत होतात आणि निघून जातात. निवडणुकीपूर्वी तेच. कार्यकर्ते वर पाहतात तेव्हा नेते पॅराशूटने येतात, निवडणूक लढतात आणि विमानाने निघून जातात.
आज मनातले सांगतो. 4 वाजता मी उठून बाल्कनीत थांबलो. माझ्यावरील जबाबदारीचेच विचार मनात होते. बाहेर अंधार आणि कडाक्याची थंडी होती. मी विचार केला, लोकांना हवे ते बोलणार नाही. जे मी अनुभवतो आहे तेच बोलेन. लहानपणी मी दादींजवळ (आजी इंदिरा गांधी) बराच वेळ घालवायचो, अभ्यास करायचो. मला बॅडमिंटन खूप आवडायचे कारण हा खेळ माझा समतोल राखत होता. दोन सैनिक मला खेळ शिकवायचे. एक दिवस त्यांनीच आजीला गोळ्या घातल्या. वडील प. बंगालमध्ये होते. रुग्णालयात आजीचा मृतदेह होता. आत अंधार, बाहेर जनसमुदाय होता. ज्यांना मी भक्कम मानायचो ते माझे वडीलच रडत होते. थोड्या वेळाने मी पाहिले तर वडील राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर राष्ट्राला उद्देशून बोलत होते. त्या अंधारानंतर खूप बदल झाला. आजही ते परिवर्तन मी आठवतो. धारिष्ट आणि आशावादाशिवाय आपण काहीच बदलू शकत नाही.
काल रात्री प्रत्येक जण मला शुभेच्छा देत होता. आलिंगन देत होता. देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. रात्री आई (सोनिया) खोलीत आली. खांद्यावर हात ठेवून तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती म्हणाली, ‘सत्ता एक विष आहे. याचा उपयोग जनतेच्या सबलीकरणासाठी करावयाचा आहे.’
राहुल यांच्या नव्या घोषणा
*100 पैकी 99 पैसे लोकांपर्यंत पोहोचतील
मी आपल्याला हमी देऊ इच्छितो की, जनतेपर्यंत 100
पैकी 99 पैसे पोहोचतील. तुम्ही-मी मिळूनच भ्रष्टाचार निपटून काढू शकू.
*काँग्रेसमध्ये आता चर्चा नव्हे, निर्णय होतील
आता पक्षात सर्वांचे मत जाणून घेतले जाईल. मी वकील नव्हे, जज असेन. काँग्रेसमध्ये केवळ चर्चा नाही, आपल्यासाठी निर्णय घेतले जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.