श्राद्ध पक्षातील सोळा दिवसांमध्ये लोक
आपल्या पितरांना पाणी देतात तसेच त्यांच्या मृत्यू तिथीला श्राद्ध करतात. पितरांचे ऋण श्राद्ध कर्माद्वारे फेडले जाते. पितृपक्ष श्राद्धासाठी निश्चित करण्यात आलेला तिथींचाएक समूह आहे. वर्षातील कोणत्याही मासात तसेच तिथीला स्वर्गवासी झालेल्या पितरांसाठी पितृपक्षातील त्या तिथीला श्राद्ध केले जाते.
पौर्णिमेला मृत्यू झाला असल्यास भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला श्राद्ध करण्याचे विधान आहे. या दिवसापासून श्राद्ध पक्षाला सुरुवात होते. श्राद्धाचा अर्थ श्रद्धेने जे काही दिले जाते असा आहे. पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने पितृगण वर्षभर प्रसन्न राहतात. धर्म शास्त्रानुसार पितरांचे पिंडदान करणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुष्य, आपत्य, नातवंड, यश, स्वर्ग, लक्ष्मी, धन-धान्य या सर्व गोष्टी प्राप्त होतात.
श्राद्ध काळात पितरांना आशा असते की, आपले आपत्य पिंडदान आणि तर्पण करून आपल्याला प्रसन्न करतील. या आशेवर ते पितृलोकातून पृथ्वीलोकात येतात. याच कारणामुळे हिंदू धर्म शास्त्रात प्रत्येक हिंदू व्यक्तीने पितृपक्षात श्राद्ध करणे आवश्यक सांगण्यात आले आहे.