आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनाची बीजे रोवणारी बसवेश्वरांची वचने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गरिबीतून समाजपरिवर्तनासाठी देह झिजवला. संत गाडगेबाबा हे श्रमाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून खापरभर वरणाचे पाणी लोकांना मागत व त्या मोबदल्यात ते त्यांच्या घरी काड्यांची मोळी टाकत असत. मात्र महात्मा बसवेश्वर यांच्या समाजपरिवर्तनाच्या संघर्षाची किनार जरा वेगळी आहे. बसवेश्वर हे राजा बिज्जलाच्या कल्याण साम्राज्याचे प्रधानमंत्री होते. राजेशाही थाटाचे जीवन लाभले असतानाही केवळ धर्मसत्तेच्या स्वर्ग-नरक आणि पाप-पुण्याच्या बुरसटलेल्या कल्पनांना कायमचे हद्दपार करण्यासाठी स्वत:च्या प्रतिभेचा आणि प्रज्ञेचा वापर केला. त्यांनी लोकांना वीरशैव-लिंगायत धर्माची दीक्षा देऊन या धर्माचे पुनरुत्थान केले. धर्मांध सनातन्यांनी लोकांना स्वर्गप्राप्तीचे आमिष दाखवून पिढ्यान््पिढ्या वैचारिक गुलामीत ठेवले होते. महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटप या आगळ्यावेगळ्या विचार पीठाचे हत्यार उपसून सनातन्यांनी लोकमनावर लादलेली ही वैचारिक गुलामगिरी मोडून काढली.  

महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून विद्यमान संसदीय व्यवस्थेचे प्रारूप १२ व्या शतकातच अस्तित्वात आणले होते. मंत्रतंत्रांवर मात करण्यासाठी त्यांनी कन्नड लोकभाषेतील वचनांद्वारे सामान्यजन, शूद्र, अस्पृश्य बहुजनांच्या मनावर गारूड केले अन् त्यांच्या रोमारोमात अंगारमळा फुलवला. कन्नड वचने त्यांच्या परिवर्तनवादी लोकचळवळीचे आयुध ठरले. 

समतेची बीजे रोवली : आधुनिक संसदीय व्यवस्थेची बीजे असलेल्या अनुभव मंटपात राजा-रंक, सवर्ण-शूद्र, स्त्री-पुरुष सोबत बसत असत. ते या विचारपीठात स्वानुभव कथन करीत. सामाजिक अंगांवर व व्यंगांवर चर्चा होई आणि त्या चर्चेची टिपणे घेतली जात असत. अनुभव मंटपात झालेला निर्णय समाजाचा मोठा वर्ग पाळत असे. अशा प्रकारे अनुभवाच्या कनाती घेऊन सर्वसामान्यांनी लोकभाषेत जी वचने लिहिली त्या वचनांनी कन्नड साहित्याला मानवी कल्याणाची झालर चढवली. महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अंगांनी समाजाचे प्रबोधन केले. त्यांचे हे कार्य बहुआयामी होते.  
मंत्रांवर मात करणारी बसवेश्वरांची वचने परिवर्तनाची किमया साधणारी होती. ते म्हणायचे…. 
देव तू कैसा दावीन मी सकळा, पत्नी मागे बल्लाळा एेसा देव !  
देव कैसा आहे दाविन मी सर्वत्रा, मागे दासय्या वस्त्र ऐसा देव !  
देव कैसा आहे दावीन मी सकळा, पुत्र मागे श्रीयाळा एेसा देव ! 
या वचनांद्वारे देवाचे ‘देवत्व’ प्रगट करून महात्मा बसवेश्वर लोकांना पोटतिडकीने सांगत, मंदिरे ही शूद्र-अस्पृश्य बहुजनांसाठी कुरुक्षेत्र आहेत, तिथे लुबाडले जाते, तिकडे फिरकू नका. श्रीमंतांची भक्ती ही वाममार्गातून मिळवलेल्या कमाईच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी आहे. या कमाईवर पापाचा प्रभाव आहे. त्यामुळेच आजही मंदिरांमध्ये पापी, धनिकांचा पैसा देवावर उतरवला जात आहे. पाखंडी, ढोंगी प्रवृत्तीवर प्रहार करताना बसवेश्वर म्हणतात... 
दगडी नागाला दूध पाजताती, जित्या पाहती मारती तया 
भुकेल्या जंगमा हाकोनिया देती, लिंगा दाखविती नैवेद्य ते ! 
शिक्षणाचे महत्त्व सांगत लोकांच्या अज्ञानाचा अंधार हटवताना ते अज्ञानी समाजाची तुलना बोकडाशी करतात. बळी हा शेळ्या-मेंढ्यांचा दिला जातो, वाघसिंहाचा नव्हे ! ज्ञानाने माणसांत वाघसिंहांची ताकद येते. ते म्हणतात... 
नवसाचा बकरा सणासि आणिला, तोरण पानाला खाऊ लागे 
बळी जावयाचे तया नसे ध्यान, पोटाकडे ध्यान बापुड्याचे  
जन्म घेत असे जैसा, मरतसे तैसा, अज्ञानी तो ऐसा बळी जाय !.  
अशी हृदयाची ठाव घेणारी वचने बसवेश्वरांनी लिहिली. थोर शिवशरण संत हरळय्या हे चांभार जातीचे. सत्यशाेधनासाठी अनुभव मंटपात आलेले होते. त्यांचा मुलगा शीलवंत व सवर्ण मंत्री मधुवरस यांची कन्या कलावतीचा विवाह बसवेश्वरांनी लावून दिल्याने सनातन्यांनी ‘बसवेश्वरांनी धर्म बुडवला’ अशी ओरड करीत सम्राट बिज्जलावर दबाव आणला. अनुभव मंटप व त्यातील वचने जाळून खाक केली. आज बसवेश्वरांची केवळ १४१४ वचने उपलब्ध आहेत. इ.स. ११६७ मध्ये महात्मा बसवेश्वरांना हौतात्म्य आले.

shiva.amk@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...