आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीतुकोबांचा गाथा का अभ्यासावा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल विश्वातील मानव जातीच्या कल्याणाच्या गोष्टी श्रीतुकोबांनी लिहून ठेवल्या आहेत. म्हणून हे साहित्य प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असा त्यांचा अट्टहास होता.
श्रीतुकोबारायांनी भरपूर अभंग लिहिले. आपल्या मानव देहाचे आणि जीवनाचे प्रयोजन सांगताना लिहितात "धरिल्या देहाचे सार्थक करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक' आता हे करताना आनंदमय सृष्टीच्या निर्माणात ज्या ज्या गोष्टींची बाधा येते त्या त्या गोष्टी बाजूला सारणे हे कर्तव्यच ठरते.
म्हणून उच्च गुणांनी युक्त, अहंकारविरहित, अतिशय नीतिमान असा माणूस निर्माण केला की श्रीतुकोबांना अभिप्रेत अशी आनंदमय सृष्टी अापोआप तयार झाली असती. म्हणून त्यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून जगाला नीतिमत्ता शिकविणे सुरू केले. ते लिहितात-
आम्हा हेचि कौतुक । जगा द्यावी नित ।।
चुकती फजित । करावे ते ।।
विश्वव्यापक अशी रचना :

श्रीतुकोबांनी आपल्या अभंगातून कोरड्या ज्ञानींना सडकून काढले आणि भोळ्याभाबड्या अज्ञानी लोकांच्या मनात आत्मविश्वास जागविला. ते लिहितात- एक परी बहीर बरे । परी ती ढोरे ग्यानगंडे. बहीर म्हणजे अडाणी माणूस आणि ग्यानगंडे म्हणजे ज्ञानाचा अहंकार झालेले लोक. अशी माणसे ही ढोर आहेत असे श्रीतुकोबा म्हणतात. ज्ञानाचा अहंकार असलेले लोक कोडीयाचे गोरेपण / तैसे अहंकारी ज्ञान असे वाटत. आपल्या अभंग रचनेचा हेतू श्रीतुकोबांना माहीत होता. ते लिहितात-
नव्हे शब्द एकदेशी / सांडी गवशी कोणाला //१//
झाली माझी वैखरी / विश्वंभरी व्यापक //धृ//
एकदेशी म्हणजे एकांगी. तुकोबा लिहितात की माझे शब्द हे एकपक्षी किंवा एकांगी नाहीत, कुणाची तरी बाजू मांडणारे आणि कुणावर तरी अन्याय करणारे असे पक्षपाती नाहीत. तर ते विश्वातील समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी लिहिले गेलेले आहेत.
म्हणूनच माझी वैखरी ही सर्व विश्वाचं कल्याण करण्याएवढी व्यापक झालेली आहे. अजून एका अभंगात तुकोबा लिहितात की जसे माझे शब्द हे ‘एकदेशी’ नाहीत तसे माझे कवित्व म्हणजे काही एकामागून एक बाहेर पडणारे टांकसाळी नाणे सुद्धा नाहीत.
नव्हे हे कवित्व टांकसाळी नाणे ।
घेती भले जन भले लोक ।।१।।
लागलासे झरा पूर्ण नवनीते ।
सेविलिया हित फार होय ।।धृ।।
माझे कवित्व म्हणजे टांकसाळीतून हवे तेव्हा, हवे तसे आणि हवे तेवढे नाणे काढावे तसले नाही. तोचतोचपणा असलेले नाही तर नित्य नवीन असे नवनीत आहे. या काव्यात लोकांच्या भल्याचा विचार आहे. म्हणून समाजातील जे कोणी भले लोक आहेत ते माझ्या या काव्याचा आशय आणि उपदेश शिरसावंद्य मानतात.

माझे कवित्व म्हणजे जणू काही पूर्णपणे लोण्याचा झरा आहे. यात तुम्हाला ताकाचा (अर्थात फोलपण) लवलेशही आढळणार नाही. तेव्हा असे हे नवनीतरुपी काव्याचा आशय समजून घेतलात आणि त्या प्रमाणे आचरण केलात तर तुमच्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
अर्थासहित पाठांतर करा :
अखिल विश्वातील मानव जातीच्या कल्याणाच्या गोष्टी तुकोबा लिहू शकले कारण त्यांचा आमचा स्वदेश । भुवनत्रयामाजी वास बाणा होता. अवघे त्रिभुवन म्हणजे त्यांचा स्वदेश झाला होता. म्हणून मानव कल्याणाचे हे साहित्य प्रत्येक मनुष्याने वाचलेच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. ते वाचत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याची भावनाही तुकोबा बोलून दाखवतात. शब्द हे केवळ घोकण्याचे साधन नाही तर प्रत्येक शब्दागणिक येणारा अर्थ सुद्धा आपण समजून घ्यायला हवा असे तुकोबांना वाटत होते. एका अभंगात लिहितात-
अर्थेविन पाठांतर कासया करावे ।
व्यर्थची मरावे घोकूनिया ।।
घोकूनिया काय वेगी अर्थ पाहे ।
अर्थरूप राहे होऊनिया ।।
तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी ।
नाही तरी गोष्टी बोलो नका ।।
अर्थाविना पाठांतर करणे म्हणजे नुसते घोकून मरणे होय. घोकण्याऐवजी तुम्ही त्या शब्दांचा मथितार्थ नीट समजून घ्या आणि तो समजल्यानंतर तुम्ही स्वतः अर्थरूप होऊन राहा. म्हणजे एकदा का अर्थ समजला की तुम्ही त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करा. अन्यथा कोरडे मार्गदर्शन करणे बंद करा.

म्हणून आपण साऱ्यांनी तुकोबांचा अभंगरूपी नवनीत असा झरा नित्य नेमाने सेवन केला पाहिजे. कारण ‘लागलासे झरा पूर्ण नवनीते । सेविलिया हित फार होय’ याच्या सेवनाने आपले फार फार कल्याण होते.
बातम्या आणखी आहेत...