आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम बुद्धांचे निर्वाण !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्वाण ही संकल्पना बौद्ध धर्मातील चार आर्यसत्यांवर कळस चढविणारी ! महायान आणि हिनयान या पंथांना निर्वाण अवस्था हे ध्येय मान्य आहे. निर्वाण पदापर्यंत पोहचले त्याला अर्हत ही संज्ञा आहे. निर्वाण हा शब्द निस् + वात् या क्रियापदापासून तयार झालेला आहे.

त्याचा अर्थ to blow out, to become cool आहे. निर्वाण स्वरुपासंबंधी मतभेद आहेत. निर्वाण म्हणजे अस्तित्वाचा संपूर्ण शेवट किंवा शून्यता असा आहे. त्याचे स्वरुप पूर्णपणे नकारात्मक किंवा अभावात्मक असे आहे. अशी अभावात्मक अवस्था कोणालाही आकर्षित करू शकणार नाही.

निर्वाणाचा संदर्भ दुःखनिरोध या तिसऱ्या आर्यसत्याच्या संदर्भात येतो. त्यानुसार निर्वाण म्हणजे सर्व दुःखांचा शेवट असा अर्थ आहे. निर्वाणाची तुलना नेहमी दिव्याच्या विझलेल्या ज्योतीशी केली जाते. दिव्यामधील तेल संपल्यानंतर दिवा विझतो व ज्योत फडफडत नाही. तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा नष्ट झाल्या म्हणजे तिला निर्वाण मिळून परमशांती मिळते.

निर्वाणाला भावात्मक आणि अभावात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. परंतु त्याची भावात्मक बाजू भाषेत मांडणे शक्य नसल्याने त्याचे नेहमी अभावात्मक वर्णन केले जाते. निर्वाणाचा अर्थ सर्वच अस्तित्वाचा शेवट असा नसून मिथ्या आशा, आकांक्षांचा शेवट असा असल्याचा पुरावा पाली
वाङ्मयात मिळतो, असे डॉ. राधाकृष्णन यांचे मत आहे.

निर्वाण अवस्था ही एक भावात्मक आनंदाची आणि परिपूर्णतेची अवस्था आहे. निर्वाण म्हणजे अस्तित्वाचा शेवट नसून ते एक प्रकारचे अस्तित्त्व आहे की ज्यामध्ये अहंभाव नाही आणि म्हणून दुःखही नाही. आत्मविश्वास, शांती, आनंद आणि शुद्धता यांनी परिपूर्ण अशी ती अवस्था आहे.
निर्वाणामध्ये उपाधिशेष निर्वाण आणि अनुपाधिशेष निर्वाण असा भेद केला जातो. उपाधिशेष निर्वाणात पंचस्कंद शिल्लक असतात म्हणजेच उपाधिशेष निर्वाण जिवंतपणी मिळविता येते, परंतु अनुपाधिशेष निर्वाणात सर्व अस्तित्वाचा शेवट होतो. उपाधिशेष निर्वाणात भावना व इच्छा यांचा नाश होतो.
एखाद्या व्यक्तीनेच निर्वाण प्राप्त केले असे म्हटले जाते तेव्हा त्याने उपाधिशेष निर्वाण मिळविले असा अर्थ असतो. हा भेद निर्वाण आणि परिनिर्वाण यामधील भेदाप्रमाणे आहे. परिनिर्वाण याचा अर्थ अस्तित्वाचा संपूर्णपणे शेवट असा आहे.

मिलिंद पन्ना या ग्रंथात नागसेन या बौद्ध आचार्याने परिनिर्वाणानंतर बुद्धाचे अस्तित्व संपले असे म्हटले आहे. डॉ. राधाकृष्णन यांच्या मते मानवाचे सामान्य अस्तित्व हे Being आणि note being यांचे मिश्रण असते.
निर्वाण मात्र केवळ Beingची अवस्था आहे. बुद्धाने स्वतः निर्वाणाचे लक्षण करण्याचा प्रयत्न केला नसला तरी निर्वाण हे सर्व परिवर्तनामध्ये अनुस्यूत तत्त्व असल्याचे दिसते. पाली वाङ्मयात निब्बाणं परमंसुखं ! असा उपदेश आहे. त्यामुळे काही अभ्यासक बौद्ध तत्त्वज्ञानाला सुखवादी म्हणू लागले.
- प्रा. विष्णू बोरकर, अहमदनगर
बातम्या आणखी आहेत...