आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्ध म्हणतात, गरजेपुरती व सन्मार्गानेच धनप्राप्ती योग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऱ्या जगाला ज्ञानाचा, शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या धम्मात भिक्षू संघ जसा मोठ्या प्रमाणात होता तसाच उपासक व उपासिकांचा (गृहस्थांचा) संघही मोठ्या प्रमाणात होता. गृहस्थ जीवनात धम्माचं स्थान अतिमोलाचं असतं. पण आताच्या काळात धनालाच अतिमहत्त्व दिलं जातं.
 
भगवान बुद्धांनी आपल्या उपजिविकेसाठी आवश्यक तेवढेच व चांगल्या कर्माने, मार्गाने कमविलेल्या धनालाच योग्य म्हटलेले आहे. अशा धनासोबतच स्वत:च्या शिलाच्या रक्षणासाठी संपत्ती नाशाची सहा कारणे सांगून उपासकांना मार्गदर्शन केले आहे.
 
१. मद्यपान वगैरे व्यसन : दारू, गांजा, अफीम आदी मादक पदार्थ नशेच्या व्यसनाने तत्काळ धननाश होतो.  कलह, भांडणे वाढून शांतता नष्ट होते. देह रोगांचे घर बनते. अपयश, निराशा येते. लाजलज्जा नष्ट होते. बुद्धीचा नाश होऊन व्यक्ती कुकर्माकडे झुकते. 
 
२. गर्दीत भटकणे (भरकटणे) : स्वत:सह पत्नी, मुले, आई-वडील असुरक्षित होतात. जमीन, घर, दागिने यांची विक्री होते. आपल्याबद्दल उगीचच शंका-कुशंका निर्माण होऊन खोटा आळ घेतल्याने जाळ्यात अडकून दु:खाचे कारण होते.
 
३. व्यभिचाराच्या नादी लागणे : वाईट कर्माकडे लक्ष लागल्यास शील, धन, विचार-आचार, बुद्धीचा नाश होऊन शरीराची, मनाची व कुटुंबाची हानी होते. 
 
४. जुगार, सट्टा खेळणे : जिंकल्यास वैर, द्वेष, राग निर्माण होऊन शत्रूपासून प्राणांची हानी होऊ शकते. हरल्यास पश्चात्ताप, राग, द्वेष, वैरासारखे विकार निर्माण होतात. धननाश होतो.
कोणीही विश्वास ठेवत नाही. मित्र, नातेवाईक, कुटुंबीय दुरावतात. समाजात मान-सन्मान राहत नाही.
 
५. कुसंगती : धूर्त, कृतघ्न, व्यसनी, भांडखोर, व्यभिचारी व्यक्तीशी मैत्रीने स्वत:सह कुटुंबाच्या मानसन्मान व धनाची हानी होते.
 
६. आळस : थंडी आहे. ऊन आहे. संध्याकाळी करू, सकाळी करू अशा अनेक बहाण्यांनी उद्योग टाळण्यातून आळस निर्माण होतो. समाजात मागे पडून शारीरिक, मानसिक आरोग्यासह धन व मान-सन्मानाची हानी होते. 

जीवन जगण्यासाठी पैसा, धन महत्त्वाचे असले तरी धनसंपत्ती कमावणे एवढाच जीवनाचा हेतू नाही. पैशांनी सुखसोयी निर्माण करू शकतो. पण मनाचे सुख, समाधान, झोप, आराम, प्रसन्नता, तृप्ती विकत घेऊ शकत नाही.
 
 अशांत, विकारी, रोगी मनाला वर्तमानात स्थिर करून शांत, पवित्र, निर्मळ, विकारविरहित, निरोगी करण्यासाठी भगवान बुद्धांनी आर्यअष्टांगिक मार्ग, ध्यानधारणा, समाधी, विपश्यना अशा चाळीस साधना (कर्मस्थाने) सांगितल्या आहेत. धम्ममार्गाने चालणारी व्यक्ती मनाने आणि शरीरानेही निरोगी शांत, पवित्र व निर्मळ असतो. समाजाचे मंगल हीत साधणारा असतो. म्हणूनच बौद्ध धम्म हा जीवन जगण्याची कला असल्याचे म्हटले जाते.
बातम्या आणखी आहेत...