आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधुता, समता, विवेकाचा संगम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा बसवेश्वर हे परिवर्तनवादी विचारवंत महापुरुष होते. त्यांनी बाराव्या शतकात अापल्या थोर वचनांच्या माध्यमातून समाजाला तत्त्वज्ञानाचे धडे दिले. ते अाजही लागू पडतात. त्यांनी मांडलेल्या समता या क्रांतिकारी विचारांबद्दल अाजच्या नव्या पिढीतील लोकांना अादरयुक्त उत्सुकता अाणि कुतूहलही दिवसेंदिवस वाढते अाहे. ही समाधानाची व अानंदाची बाब अाहे. अाज कायद्याने अस्पृश्यता दूर झालेली असली तरी ते समूळ नष्ट झालेले नाही. जातिभेद, अंधश्रद्धा अाजही समाजातून म्हणावी तशी दूर गेलेली नाही. पण बसवेश्वरांनी बाराव्या शतकात, अनुभव मंटपात सर्व भेद बाजूला ठेवत स्त्रियांनाही साक्षरतेसाठी प्रोत्साहित केले. स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे याचा बसवेश्वरांनी पुरस्कार केला. बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपातून लोकोन्नती व अात्मोन्नती कार्याला प्रेरणा मिळाली. ते कार्य नेटाने पुढे गेले, तसेच सामाजिक, अार्थिक अाणि धार्मिक ही समतावादाची तीन प्रमुख अंगे अाहेत, हे तत्त्वज्ञान प्रत्येकाने स्वत:मध्ये व स्वत:भोवती जोपासावे असे अाहे. मानवांमध्येच भेदभाव होऊ नये, असे ते नुसते सांगत नसत, तर ते समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. समानतेचे महत्त्व त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय राज्यघटनेने महिलांना स्वातंत्र्य दिलेले असले तरी अाजची प्रत्यक्षातील स्थिती काहीशी वेगळी अाहे. अाजवरच्या इतिहासात वेगवेगळ्या काळात, महिलांचे महत्त्वही वेगवेगळे होते. पण बसवेश्वरांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी देण्याचा, जातिभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 
 
विविध कालखंडांत विविध देवदेवतांची पूजा-अर्चा होत असे. मंदिरे उभारली जात. ती देवाचीच अाराधना होती. पण बाराव्या शतकात बसवेश्वरांनी श्रम हाच कैलास हे तत्त्व मांडले. देवाच्या नावाखाली श्रम न करणे व पैशाचाही वापर करणे हे बसवेश्वरांना मान्य नव्हते. त्या काळातील बसव मंटपात एकेश्वरवादाचा सिद्धांत मांडला गेला. देह हेच देवालय बनवून गळ्यात इष्टलिंग धारण करून त्याची अाराधना करण्याचा संदेश त्यांनी दिला. त्याबरोबर स्वत:जवळ इष्टलिंग रूपाने असलेल्या देवाची स्वहस्ते पूजा करावयाची, देवाच्या प्राप्तीसाठी अन्यत्र जाण्याची गरज नाही, असा एकेश्वरवादी सिद्धांत अनुभव मंटपात सर्वच शरणांनी स्वीकारला. अंधश्रद्धेस प्रखर विरोध करणारे क्रांतिकारी विचार बसवेश्वरांच्या मनात अाले. त्यामुळे त्यांनी देवळात बंदिस्त असलेल्या देवाला स्त्री-पुरुषांच्या तळहातावर ठेवून इष्टलिंगाचा वसा दिला.
 
श्रम हाच कैलास, असे तत्त्व सांगणाऱ्या बसवेश्वरांनी समाजासमोर अादर्श वस्तुपाठ घालून दिला. त्यासाठी बसवेश्वरांनी स्वत:च्या जीवनातही समतेला अधिक महत्त्व दिले. त्यांनी उभारलेल्या अनुभव मंटपातून ज्यात समतेचा, दासोह व इष्टलिंगा या तत्त्वांची पायाभरणी झाली, ती पुढील काळातील समाज, विश्वाच्या उभारणीसाठी मोलाची ठरली. तशी त्यांची धारणाही होती. बसवेश्वरांचे कार्य हे अंधारातून, उजेडाकडे नेणारे अाहे. अाजच्या या संगणकीय युगातही बसवेश्वरांच्या विचाराची, तत्त्वांची खऱ्या अर्थाने गरज अाहे.  
 
बातम्या आणखी आहेत...