आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चला आळंदीसी जाऊ । ज्ञानदेवा भेट घेऊ ।।

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवघाचि संसार सुखाचा करीन ही संकल्पना साकारण्यासाठी व धर्माचे रक्षण करून त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरी रूपाने एक शास्त्रच तयार केले. नुसते तयारच केले नाही, तर लोकांना शुद्ध, सात्त्विक सुख प्राप्ती होणाऱ्या धर्माचे ज्ञान विश्वासासह देऊन धर्मच लोकमंगल करणारा आहे हे पटवून दिले. लोकमंगल करणारा महान धर्म कोणता? असा प्रश्न तुम्हाला पडेल, तर त्याचे उत्तर आहे मानव धर्म होय. ज्ञानेश्वरांनी हे सर्व वाङ््मयातून ज्ञानेश्वरीसारख्या अलौकिक ग्रंथातून माधुर्यपूर्ण काव्यातून प्रगट केले. ज्ञानदेव म्हणजे कुशल पंडिताची अलौकिक निरपेक्ष दृष्टी, अप्रतिम कवित्व शक्ती व अलोट माधुर्य या तीन गुणांचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे ज्ञानदेव. ज्ञानेश्वरांना साऱ्या विश्वाची काळजी. सारे विश्वप्रेम त्यांच्या ठायी भरलेले हाेते. या विश्वप्रेमापोटीच त्यांच्या काव्यास माधुर्य भक्तीची कोमलता आली. वृत्तीची गगनचुंबी उदारता, रचनेची सहजता व सरलता हे प्रथम श्रेणीचे गुण ज्ञानदेवांकडे शांतरसाने तुडुंब भरलेले. त्यातूनच ब्रह्मरसाची गोडी निर्माण झाली व गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकटली.

व्यक्ती ही समाज व संस्कृती याहून वेगळी राहूच शकत नाही. जीवन सुखी-समाधानी होण्यासाठी सत्कर्माचा अभ्यास, अध्यात्माचे मनन, चिंतन करीत राहणे श्रेयस्कर असून, त्याचप्रमाणे सर्वांनी जीवन जगावे. त्यात सत्कर्माची वाढ व्हावी. परस्पर प्रेमाचा वर्षाव व्हावा. पापवृत्तीचा अंध:कार नष्ट होऊन स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. तत्त्वनिष्ठ, ईश्वरनिष्ठांचा समुदाय या भूतलावर सतत राहावा हे ज्ञानदेवांचे विचार. सवं भूतमात्राच्या ठिकाणी परमात्मा पाहता यावा अशी ज्ञानदृष्टी सर्वांना लाभावी म्हणून महान मानवी कार्य करणारा आद्य क्रांतिकारक परमयोगी, जिवाचा जिव्हाळा असणाऱ्या ज्ञानदेवांनी आपले कार्य संपल्यावर जिवंत समाधी घेण्याचे ठरविले. मग त्यांनी नामदेवांबरोबर तीर्थयात्रा केली. पंढरपुरातच समाधीचा निश्चय केला. पांडुरंग व नामदेवांचा निरोप घेऊन ज्ञानदेव आळंदीस आले. कठोर मनाने, पण प्रेमळ वाणीने आपला निर्धार सांगितला. साऱ्या पंचक्रोशीत पुरासारखी ही बातमी फुटली. लोकांचे थवेच्या थवे आळंदीकडे लोटले. विसोबा खेचर, गोरा कुंभार, नामदेवाची जनी, चोखामेळा, सावता माळी, सोयरा, चांगदेव अशी संतमंडळी दाखल झाली. एकादशी कीर्तनाने रंगली. द्वादशीला साऱ्यांनी पारणे फेडले आणि आपल्याच पायांनी कार्तिक वद्य त्रयोदशी चालत आली. ज्ञानदेव आज समाधी घेणार... सगळ्यांचा लाडका ज्ञानदा अाज शेवटचाच दिसणार... सारे संत भावविभोर झाले. ज्ञानदेव मात्र आनंदी दिसत होते. ज्ञानदेवांनी इंद्रायणीकाठी स्नान उरकले. सर्वाचा प्रेमभरे निरोप घेऊन सोपान, मुक्ताईला अखेरचे अलिंगन दिले. नंतर निवृत्तीदादांचा हात धरून समाधी स्थळाकडे गेले.

समाधीची जागा स्वच्छ झाडून, गोमयाचा सडा टाकून त्यावर सुंदर रंगावली रेखाटल्या होत्या. समाधी स्थान पांढरे शुभ्र वस्त्र व नानाविध फुलांनी सुशोभित केले होते. समईच्या ज्योती प्रसन्नपणे ज्ञानदेवांची वाट पाहत उभ्या होत्या. समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. वस्त्रावर पसरलेल्या नानाविध बेल, तुळशी फुलांचा घमघमाट सुटला होता.
समाधीची ती जागा, तो परिसर, तिथली शोभा पाहून ज्ञानदेव अतिशय प्रसन्न झाले. ज्या ठिकाणी शब्द नाचतात, ज्या ठिकाणी विचार थकतात. जेथे आनंदाचे चैतन्य असून, आकाशाचे पैलतीर आहे. बंधमोक्षाचे निर्वाण आहे. क्षितिजापासून दूर दहा दिशांचा ज्या ठिकाणी अंत होतो अशा ठिकाणी ज्ञानदेव गेले. ज्ञानोबांची पूर्णपणे समाधी लागली. निवृत्तीने मग अतिशय जड अंत:करणाने शिळा लावून घेतली. सर्व संतांनी समाधीवर फुले वाहिली. जयजयकार केला आणि त्याचवेळी प्रचंड कडकडाट होऊन आकाशवाणी झाली...

अगा अगा ज्ञानेश्वरा । चंद्रतारा जन दिनकरा ।
तंव तुझी समाधी स्थिर । राहो रे निरंतर ।।
जववरी हे क्षितिमंडळ । जववरी हे समुद्रजळ ।
मग कालक्षयी यथाकाळ । माझ्या हृदयी ठसावे ।।
सर्व संतांनी डोळे भरून एकदा समाधीकडे पाहिले. जड पावलांनी ते माघारी फिरले.
सुचेता देशपांडे,
भारुडरत्‍न,औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...