आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुस्मृती या ग्रंथातील स्त्रीविषयक विचारांचे सार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -मनुस्मृतीतील ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ (स्त्री ही स्वातंत्र्याला प्राप्त नाही) किंवा ‘न भजेत् स्त्री स्वतंत्रताम्’ (स्त्रीने स्वातंत्र्य घेऊ नये) या विधानांच्या निमित्ताने मनूचे स्त्रीविषयक समग्र विचार जाणून घ्यायला हवेत. मनुस्मृतीमधील 12 अध्यायांत एकूण 2684 श्लोक आहेत. त्यापैकी सुमारे 400 श्लोकांमध्ये स्पष्ट किंवा सूचक स्त्रीविषयक विचार आढळतात.
मृत्यूनंतर सद्गती मिळावी म्हणून श्राद्धकर्मासाठी, वंशसातत्यासाठी, वारसा म्हणून एक तरी औरस पुत्र हवाच, ही मानसिकता आणि मुलीचा जन्म म्हणजे दु:खद घटना मानली जाणे या विचाराला छेद देणारा विचार मनूने मांडला आहे. ‘पुत्रेण दुहिता समा’ (मुलगा-मुलगी समान आहेत.) मुलीच्या द्वारे वंशसातत्यही राखता येते आणि ती संपत्तीला वारसही होऊ शकते. कन्या ही पुत्रिका होऊन आपल्या पित्याच्या सद्गतीचे साधन होऊ शकते. अगदी श्राद्धकर्म करणारा ‘बांधव’ म्हणूनही औरस पुत्राऐवजी इतर 11 प्रकारच्या पुत्रांचे पर्यायही मनूने दिले आहेत. त्यात क्षेत्रज, कानीन, सहोढ, पौनर्भव हे पुत्र तर असे आहेत की, त्यांचा पुत्र म्हणून स्वीकार करण्यास आजचा पुरोगामी सुधारकही क्वचितच तयार होईल.
कन्यादान हे केवळ एखाद्या वस्तूचे दान म्हणून मनू त्याकडे पाहत नाही. कन्येच्या पित्यानेही तसा विचार न करता योग्य वर पाहूनच कन्येचे लग्न लावून द्यावे, असे तर सांगतोच; पण या कन्यादानातून जी पत्नी मिळेल तिच्याशीच संसार करण्यातच देवांना प्रिय आचरण घडेल, असा उपदेश मनू पुरुषाला करतो, म्हणजे दान कल्पनेची व्याप्ती ही अशी कन्येच्याच पथ्यावर पडणारी आहे. हुंडा पद्धतीचा आविष्कार करणारा ‘आसुर’ विवाह कोणीही कधीही करू नये, असे मनूचे मत आहे. 16 वर्षे वयाच्या कन्येला स्वत:चा वर शोधण्याची (प्रेमविवाहाची) परवानगी मनू देतो. या प्रेमविवाहात द्रव्याचा कोणताही संबंध असता कामा नये, असा नियमही सांगितला आहे. अशा विवाहामुळे वधू-वरापैकी कोणालाही पाप लागत नाही, अशी ग्वाही मनू देतो.
लग्नविच्छेदाचाही विचार करताना मनू स्त्रीविषयी सहानुभूती प्रकट करतो. पतीनिधनानंतर विधवेने संयमी जीवन जगावे, असे तो सांगतो. मात्र, परित्यक्ता आणि विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता देतो. विवाहपूर्व किंवा वैधव्यात होणार्‍ या संततीची व्यवस्था मनूने सांगितली आहे.
मुलींचेही उपनयन करून त्यांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवण्याची वैदिक काळातील पद्धत मनूच्या काळी परिस्थितीवश बंद पडलेली दिसते; मात्र मनू म्हणतो, आश्रमातील प्रमुख शिक्षक अकाली मृत्यू पावल्यास शिक्षण देण्याचे कार्य त्यांच्या पत्नीने करावे. स्त्री, पुरुष आणि अपत्ये यांनी मिळूनच पूर्ण मनुष्य होतो, असेच त्याचे मत आहे. स्त्री-पुरुषाने परस्परांना संतुष्ट ठेवले पाहिजे, असे मनूला वाटते. निर्वाहाची आणि निवासाची व्यवस्था करून पती-पत्नींना स्वतंत्र संसार करता येईल, त्यांनी एकत्र कुटुंबातच राहिले पाहिजे असे नाही, अशी व्यवस्था मनूने सुचवली आहे. कुटुंबापुरती आर्थिक सत्ता त्याने स्त्रीकडेच सोपवण्यास सांगितले आहे. मात्र, कुटुंबाच्या चरितार्थासाठी स्त्रीला धन मिळवावे लागणे मनुला इष्ट
वाटत नाही.
याचा अर्थ, ‘अर्थ’ संपादनाचे स्त्रीचे स्वातंत्र्यच त्याने नाकारले आहे, असे मात्र नाही. स्त्रीचे अर्थसंपादनाचे मार्गही त्याने नोंदलेले आहेत. केवळ स्त्रीचाच ज्यावर अधिकार चालेल अशा धनाचा त्याने निर्देश केलेला आहे. वारसा हक्काने स्त्रीला मिळणार्‍या धनाची त्याने माहिती दिलेली आहे. मनूच्या व्यवस्थेत वारसाहक्काने पुरुषापेक्षा स्त्रीलाच अधिक संपत्ती मिळत असल्याचेही आढळते.
खरे म्हणजे केवळ ‘स्त्रीबद्दलचा विचार’ मनुस्मृतीचा खास विषयच नाही. त्यामुळेच अशी समग्र चिंतनाची अपेक्षाच करता येणार नाही. तरीही स्त्री जीवनाशी संबंधित पुष्कळ मुद्द्यांचा परामर्श मनूने घेतला आहे. त्यात अनेक विषय तर आजही समाजातील स्त्रीविषयक प्रचलित धारणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत.
(डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे ‘मनु आणि स्त्री’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित भाग.)