आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या-छोट्या गोष्टींतील आनंद शोधायला शिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असामान्य बनण्याचे वेड हे अत्यंत सामान्य असते. पण, मुळातूनच अत्यंत साधे-सामान्य असणे हे असामान्यत्वाचे लक्षण आहे. यातही हृदयाच्या साधेपणाला अधिक महत्त्व व अधिक अर्थगर्भता आहे. आपल्या ‘अहं’ची झेप ही नेहमीच असामान्य बनण्याच्या दिशेने झेपावत असते. पण, त्या ‘अहं’चे विसर्जन करायला शिका.

कुठलीही सर्वसामान्य गोष्ट असाधारण सावधानतेने करण्याची मजा अनुभवा. लक्षात घ्या, सृजनशीलतेचा प्रत्यक्ष कार्याशी कुठलाच संबंध असत नाही; पण तो तरल सावधानतेच्या गुणवत्तेशी मात्र असतो. कमालीची कृतज्ञता, आनंद आणि सखोल सावधानतेचा सृजनशीलतेशी खरा अनुबंध असतो. खरे तर, आयुष्य हे प्रसंग-घटनांनी भरलेले असते. पण, ‘अहं’ला मोठय़ा घटनेशी कर्तव्य असते. इतकेच नव्हे, तर या भल्या थोरल्या घटनेत वा गोष्टीतच संपूर्ण साफल्य-समाधान आहे, असे त्याला वाटत असते. खरे तर, प्रत्यक्ष जीवनात कुठलीही गोष्ट ही लहान-मोठी असत नाही. ज्या क्षणी एका मोठय़ा कृतज्ञतेची आणि आदराची-आभाराची प्रवृत्ती तुम्ही जोपासता, तेव्हा मग छोट्या-छोट्या गोष्टींद्वारेही मोठा आनंदाचा ठेवा तुम्हाला गवसतो.

संपूर्ण आनंदाची-आत्मसुखाची उपस्थिती म्हणजेच ‘जीवन’- ‘निर्वाण’ आणि या सुखसाफल्याचा अभाव म्हणजेच ‘मृत्यू’- ‘संसार’. आयुष्य हे नेहमीच ताजे टवटवीत असते. प्रेमप्रीतीही नित्यनूतन अवस्थेतच असते. ‘मी’, ‘अहं’सह जगणारे मन नेहमीच वृद्ध-र्जजर अवस्थेत जगत असते. लक्षात घ्या, अहं आणि प्रीती या दोन्ही गोष्टी एकत्र कधीच नांदत नसतात. खरेखुरे आयुष्य हे तेव्हाच जगले जाते जेव्हा ‘अहं’चे अस्तित्व नसते. ‘अहं’सह जगण्याची चव ही नेहमीच कडवटतेकडे नेणारी असते. यातही हा कडवटपणा हा ‘अहं’मधून, ‘मी’ला कुरवाळण्यातून येतो.

प्रत्यक्ष आयुष्यातून नव्हे. ‘माझ्या बायकोने मला जन्म आणि मृत्यू स्वीकारायचे कसे ते शिकवले’, असे एकाने आपल्या गुरूला सांगितले. ‘आता मी तुला जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये असलेल्या जीवनाविषयी सांगतो’, असे गुरूंनी त्याला सांगितले.