आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, होळी सण साजरा करण्यामागचा पौराणिक संदर्भ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातल्या वेगवेगळ्या भागात फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवाला "होलिकादहन" किंवा 'होळी', 'शिमगा', अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे.

हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. ब्रम्हदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री, घरात वा घराबाहेर, पृथ्वीवर वा आकाशात, मनुष्य वा प्राण्याकडून, आणि अस्त्र वा शस्त्राने मृत्यु येणार नाही. त्यामूळे तो अतिशय गर्विष्ठ झालेला होता. पृथ्वीवर त्याने विष्णू देवाची पूजा करण्यास बंदी घातली होती. या हिरण्यकश्यपचा मुलगा होता प्रल्हाद. तो भगवान विष्णूंचा भक्त होता. तो सदैव देवाच्या नामस्मरणात मग्न असे, ही गोष्ट हिरण्यकश्यपला अजिबात आवडत नसे.

सुरूवातीला त्याने प्रल्हादाला रागावून पाहिले, मारून पाहिले पण प्रल्हादाने काही देवाचे नाव घेणे बंद केले नाही. प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या गेल्या पण दरवेळी देवाने त्याचे रक्षण केले. लोक त्याला ’भक्त प्रल्हाद’ म्हणत असत.

हिरण्यकश्यप राजाची एक बहिण होती तिचे नाव होते ’होलीका’. या होलीकेला एक वर मिळालेला होता, तो असा की तिला आगीपासून कुठलेही भय नाही. मग हिरण्यकश्यपू आणि होलिकाने असे ठरवले की ’होलीका’ प्रल्हादाला मांडीवर घेउन जळत्या आगीत बसेल आणि त्या आगीमधे ’भक्त प्रल्हाद’ जळून खाक होइल. पण याहीवेळेस भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विजय झाला आणि त्या आगीत ’होलीका’ जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला.

याच ’होलीका’ च्या नावावरून आजच्या दिवसाचे नाव आहे ’होळी’.या दिवशी संध्याकाळी जी आग पेटवली जाते त्यात सगळ्या वाईटाचा अंत होतो आणि जे जे पवित्र ते वाचते असे मानले जाते.