आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलदैवत खंडोबाचे नवरात्र...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने ।
म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।।
मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं ।
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।

महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे.
‘खंडोबाचे नवरात्र’ हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रात्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी, या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात.

खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.

तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण "सदानंदाचा येळकोट’ किंवा "येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.

खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे- मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. दीपमाळा बांधणे. मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे. पायर्‍या बांधणे, ओवरी बांधणे. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठरावीक दिवशी देवदर्शनास जाणे. पाण्याच्या कावडी घालणे. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या-मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. तळी भरणे, उचलणे, दही-भाताची पूजा देवास बांधणे. पुरण-वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांना भोजन घालणे. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे-भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.

श्री खंडोबारायाची पाच प्रतीके
१) लिंग : हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते.
२) तांदळा : ही एक प्रकारची चल शिळा असून, टोकाखाली निमुळती होत जाते.
३) मुखवटे : हे कापडी किंवा पिटली असतात.
४) मूर्ती : या उभ्या, बैठ्या, घोड्यावर. तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात.
५) टाक : घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा.

खंडोबारायाचे संबंधित दिन विशेष
रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बारा प्रसिद्ध स्थाने
महाराष्ट्र :

१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा
४) माळेगाव
५) सातारे (औरंगाबाद)
६) शेंगूड (अहमदनगर)
७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद)
८) वाटंबरे

कर्नाटक :
१) मैलारपूर-पेंबर (बिदर)
२) मंगसुळ्ळी (बेळगाव)
३) मैलारलिंग (धारवाड)
४) देवरगुडू (धारवाड)
५) मण्मैलार (बळ्ळारी)
- अविनाश मोकाशी, पुजारी, अणदूर, ता. तुळजापूर