आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वदता शिवनाम, न बाधि क्रोध-काम; महाशिवरात्रीसंबंधीची आख्यायिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवदेवतांच्या नावाने साजरे केले जाणारे भारतातील जवळपास सर्व सण, उत्सव दिवसा साजरे केले जातात. नवरात्र आणि महाशिवरात्र मात्र त्याला अपवाद आहेत. महादेवाच्या तेजाचे, तपाचे, वैराग्याचे प्रतीक आठवण्यासाठी महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे पर्व आहे.

माघ महिन्यात येणारी महाशिवरात्र शिवभक्तांसाठी एक आध्यात्मिक पर्वणीच असते. महाशिवरात्रीला महादेवाचे सकाम भावना घेऊन व्रत केल्यास भक्तांच्या सर्व कामना पूर्ण होतात, तर निष्काम भावनेने केल्यास मोक्ष मिळतो, असे शिवपुराण सांगते. महाशिवरात्रीला पृथ्वीवरील महादेवाच्या सर्व पिंडींना ईश्वराचे चैतन्य मिळून त्या पुन्हा तेजतत्त्व धारण करतात, हेच महाशिवरात्रीचे खरे रहस्य असल्याचे बोलले जाते. केवळ जलाभिषेकानेदेखील भगवान शिवशंकराची आराधना पूर्ण होत असल्याची शिवभक्तांची भावना आहे.

महाशिवरात्रीसंबंधी एक आख्यायिका सांगितली जाते...
विंध्य पर्वतावरील व्याधाच्या हातून अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्र असताना तो शिकारीसाठी निघाला. रस्त्यात एक सजवलेले शिवालय आणि तेथील शिवभक्तांची गर्दी पाहून शिकारी थांबला. शिवपूजेचा सोहळा पाहून तो शिवभक्तांना हसू लागला. पुढे जंगलात खूप वेळ घालवूनही त्याला शिकार मिळाली नाही. त्याला उपवास घडला. शिकार दिसावी म्हणून तो झाडावर चढला. ते बेलाचे झाड होते. वेळ जाईना म्हणून तो (शिवभक्त शिवालयात म्हणत होते तसे) ‘हर हर.. शिव शिव’ म्हणू लागला. सावजाची वाट पाहत तो बेलाची पाने तोडून खाली टाकू लागला. ती झाडाखालच्या पिंडीवर पडत होती. त्या वेळी पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणावर बाण रोखताच हरीण म्हणाले, ‘मी गर्भवती आहे. मला मारू नका. बाळाला जन्म देऊन परत येईन.’ त्याने त्या हरणाची शिकार केली नाही. त्या वेळी तेथे शिवाचे दूत येऊन म्हणाले, ‘आज महाशिवरात्री आहे, तुला सहज जागरण व उपवास घडला. तू शिवभक्ती कर, तुला मोक्ष मिळेल.’ पुढे त्याने शिवजप करून मोक्ष मिळवल्याचे सांगितले जाते.