शारदीय नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ( 3 ऑक्टोबर, शुक्रवार) सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्री भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. शक्ती पूजनाचा हा शेवटच्या दिवस असल्यामुळे याचे विशेष महत्त्व आहे. हे देवीचे विराट रूप आहे, ज्यामध्ये पृथ्वी, आकाश सर्वकाही सामावलेले आहे.
सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर सिद्धिदात्री देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. चौरंगावर चांदी, सोने, तांबे किंवा मातीच्या कलशात पाणी भरून त्यावर नारळ ठेवा. त्याच चौरंगावर श्रीगणेश, वरुण, नवग्रहांची स्थापना करा. त्यानंतर व्रत, पूजेचा संकल्प घेऊन वैदिक व सप्तशती मंत्राचा उच्चार करून सिद्धिदात्री देवी सहित सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी.
यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रांगोळी, हळद, कुंकू, शेंदूर, दुर्वा, बेलाचे पानं, आभूषण, फुलं, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फळ, विड्याचे पानं, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजली इ. गोष्टी कराव्यात. हे सर्व विधी माहिती नसल्यास एखाद्या विद्वान पुरोहिताकडून करून घेऊ शकता.
ध्यान मंत्र
सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना यदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायनी॥