आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधू देवमामलेदार यशवंतराव महाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -साधू देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे पूर्ण नाव यशवंत महादेव भोसेकर. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या वाटेवरील करकमभोसे हे महाराजांचे मूळ गाव. हरिदेवी आणि महादेव भोसेकर यांच्या पोटी 13 सप्टेंबर 1815 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भोसे व पुणे येथे झाले. तत्कालीन प्रथेनुसार वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे सुंदराबाई यांच्याशी लग्न झाले. मामा नारायण बाजपे यांच्या पुढाकाराने यशवंतरावांनी महसूल खात्यात दहा रुपये महिन्याची कारकुनाची नोकरी पत्करली. त्यांच्या सरकारी सेवेची सुरुवात येवला (जि. नाशिक) येथे झाली. खान्देश परिसरात विविध ठिकाणी त्यांनी 43 वर्षे सेवा केली.
महाराजांनी परोपकार हा जीवनधर्म मानला. आपण लोकांचे सेवक आहोत, ही भावना त्यांनी आयुष्यभर जोपासली. निष्काम वृत्ती आणि निष्क लंक चारित्र्य हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. श्री स्वामी समर्थांनी त्यांना शालिग्राम प्रदान करून आयुष्यभर जनता जनार्दनाची सेवा करण्याची आज्ञा केली. जेथून त्यांची बदली होई, तेथे लोक त्यांना जड अंत:करणाने निरोप देत असत, तर बदलीच्या ठिकाणी त्यांच्या आगमनार्थ दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा केला जाई.
महाराजांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. मात्र, प्रत्येक चमत्कारातून त्यांच्या अंगी असलेल्या माणुसकीचेच दर्शन घडले. 1870-71 च्या भीषण दुष्काळात माणसे, जनावरे पाण्याअभावी तडफडू लागली. महाराज त्या वेळी सटाण्याचे मामलेदार होते. त्यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता केवळ लोककल्याणासाठी एक लाख 27 हजार रुपयांचा खजिना व धान्य लोकांमध्ये वाटून दिले. या प्रकरणाची चौकशी झाली. मात्र, कलेक्टरने समक्ष येऊन खजिन्याची मोजणी केल्यावर रक्कम व धान्याची पोती बरोबर भरल्याचे त्यांच्या भक्तांकडून सांगितले जाते.
यशवंतराव महाराज दामाजीपंतांचे अवतार होते, अशी श्रद्धा त्यांच्या भक्तमंडळात आहे. त्यांनी सरकारी सेवेबरोबर कथा, कीर्तन, प्रवचनाद्वारे लोकांचे प्रबोधन केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या प्रत्येक कृतीतूनच त्यांनी सद्विचारांची पेरणी केली. त्यामुळे ते केवळ मामलेदार राहिले नाहीत, तर देवमामलेदार झाले. एक निष्काम कर्मयोगी म्हणून देवमामलेदारांना उभा महाराष्ट्र ओळखतो. दासगणू महाराज, मोराणकर महाराज, प्रा. दीपक माळी यांनी देवमामलेदारांचे चरित्रग्रंथ लिहिले आहेत. मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला (11 सप्टेंबर 1887) महाराज वैकुंठवासी झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाशिक व सटाणा येथे त्यांचे समाधी मंदिर बांधले आहे. 28 डिसेंबरपासून त्यांचा समाधी सोहळा होत आहे.